“मंत्रालयाच्या पायऱ्यांनाही त्यांच्या पावलांची सवय झाली असेल…” ; अजितदादांच्या बायोपिकवर प्रवीण तरडेंचं मोठं वक्तव्य

मराठी सिनेसृष्टीत वास्तवाचा ठसा उमटवणारे दिग्दर्शक प्रवीण तरडे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. ‘धर्मवीर’सारखा गाजलेला राजकीय चरित्रपट दिल्यानंतर आता त्यांनी आणखी एका मोठ्या राजकीय व्यक्तिमत्त्वावर सिनेमा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, हा बायोपिक राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर असू शकतो, असं वक्तव्य स्वतः तरडेंनी केलं आहे. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीत नव्या राजकीय बायोपिकच्या चर्चांना उधाण आलं आहे.

‘देऊळ बंद 2’च्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत प्रवीण तरडे यांनी अनेक खुलासे केले. ‘मुळशी पॅटर्न’ आणि ‘धर्मवीर’च्या यशानंतर अनेक राजकीय नेत्यांनी स्वतःवर सिनेमा करण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला होता. काहींनी मोठ्या बजेटच्या ऑफर्स दिल्या, तर काहींनी कोरे चेक देण्याची तयारी दाखवली. मात्र, “मी हा विषय मनापासून करू शकतो का?” हा एकच प्रश्न स्वतःला विचारत त्यांनी अनेक प्रस्ताव नाकारल्याचं सांगितलं.
आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर’ आणि ‘धर्मवीर 2’ हे चित्रपट करताना भावनिक जबाबदारी जाणवल्याचं सांगताना तरडे म्हणाले की, त्या अनुभवानंतर पुन्हा चरित्रपट करायचा विचार नव्हता. पण अजित पवार यांच्या काम करण्याच्या पद्धतीने त्यांना प्रभावित केलं.

“सकाळी सहा वाजल्यापासून मंत्रालयात काम करणारा नेता मी अजितदादांच्या रूपात पाहिलाय. मंत्रालयाच्या पायऱ्यांनाही त्यांच्या पावलांची सवय झाली असेल,” अशा शब्दांत त्यांनी अजित पवार यांच्या कार्यशैलीचं कौतुक केलं. त्यांच्या आयुष्यातील संघर्ष, वेगवान राजकारण आणि कामाचा ध्यास हा सिनेमासाठी प्रभावी विषय ठरू शकतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, देऊळ बंद 2 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, प्रवीण तरडे पुन्हा एकदा मोठ्या सामाजिक-राजकीय विषयावर भाष्य करणार का, याकडे आता मराठी प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.