जळगाव हादरलं! लग्नाच्या अवघ्या २० दिवसांत नववधूचा दुर्दैवी मृत्यू; समोर आलं धक्कादायक कारण

जळगाव : लग्नानंतर नव्या आयुष्याची स्वप्नं डोळ्यांत साठवलेल्या एका नवविवाहितेचा अवघ्या २० दिवसांत दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना जळगाव जिल्ह्यात समोर आली आहे. उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे या तरुणीचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून, संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृत तरुणीचे नाव वैशाली सुनील भील (वय २०) असे आहे. त्यांचा विवाह २३ मे २०२६ रोजी जामनेर तालुक्यातील मोहाडी येथील सुनील भील यांच्यासोबत मोठ्या उत्साहात पार पडला होता. लग्नानंतर काहीच दिवसांत संसाराची सुरुवात करत असतानाच काळाने त्यांच्यावर झडप घातली.
माहितीनुसार, वैशाली या पतीसोबत चोपडा तालुक्यातील खामखेडा येथे नातेवाईकांच्या लग्नसमारंभासाठी गेल्या होत्या. कार्यक्रम आटोपून परतल्यानंतर त्यांना प्रचंड थकवा जाणवू लागला. दरम्यान, भरदुपारी त्यांना अचानक तीव्र ताप आला आणि चक्कर येऊन त्या घरातच कोसळल्या.

घाबरलेल्या कुटुंबीयांनी त्यांना तातडीने नेरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारांसाठी जळगाव शासकीय रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. दुर्दैवाने, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वाटेत त्यांचा मृत्यू झाला.

जळगाव जिल्ह्यात सध्या तीव्र उष्णतेची लाट असून प्रशासनाने ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. लग्नाची धावपळ, प्रवासाचा ताण आणि कडक उन्हाचा फटका यामुळेच वैशाली यांना उष्माघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.