टक्कल करून लपला, पण ‘त्या’ ३० मिनिटांनी घात केला; NEET पेपरफुटीत नाशिक कनेक्शन उघड

नाशिक : देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या NEET-UG २०२६ पेपरफुटी प्रकरणात आता नाशिकमधून मोठा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. पोलिसांच्या रडारवर असलेला मुख्य संशयित शुभम खैरनार हा अटकेपासून बचाव करण्यासाठी टक्कल करून वेषांतरात फिरत होता. मात्र, तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे नाशिक गुन्हे शाखेने त्याला अखेर ताब्यात घेतले. या अटकेनंतर पेपरफुटी रॅकेटची कार्यपद्धती समोर येऊ लागली असून तपास यंत्रणाही हादरल्या आहेत.

शुभम खैरनार हा भोपाळमधील सीहोर येथे असलेल्या सत्यसाई विद्यापीठात बी.ए.एम.एस.च्या अंतिम वर्षात शिक्षण घेत होता. राजस्थान पोलिसांकडून मिळालेल्या संवेदनशील माहितीनंतर नाशिक पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला होता. दरम्यान, तो देवदर्शनासाठी बाहेर पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवत पोलिसांनी सापळा रचला आणि त्याला ताब्यात घेतलं. आता सीबीआयचं विशेष पथकही नाशिकमध्ये दाखल झालं असून शुभमची कसून चौकशी सुरू आहे.
तपासादरम्यान समोर आलेली माहिती अत्यंत धक्कादायक आहे. सुरुवातीला प्रश्नपत्रिका प्रिंटिंग प्रेसमधून फुटल्याची चर्चा होती. मात्र, तपासात वेगळंच चित्र समोर आलं. प्रश्नपत्रिकांचे ट्रंक कुरिअरद्वारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवले जात असताना, एका संशयित कर्मचाऱ्याच्या मदतीने हे ट्रंक केवळ ३० मिनिटांसाठी उघडण्यात आल्याचं उघड झालं आहे. याच अर्ध्या तासात संपूर्ण प्रश्नपत्रिका अत्याधुनिक हाय-डेफिनिशन पोर्टेबल स्कॅनरने स्कॅन करण्यात आली.

मोबाईलने फोटो काढल्यास चित्र अस्पष्ट येण्याची शक्यता असल्याने आरोपींनी स्कॅनरचा वापर केल्याचं समोर आलं आहे. स्कॅन केलेला पेपर नंतर टेलिग्रामद्वारे पुढे पाठवण्यात आला. तपास यंत्रणांच्या मते, शुभम खैरनारने हा पेपर मिळवल्यानंतर तो हरियाणातील एका खरेदीदाराला विकल्याचा संशय आहे. या व्यवहारात मोठ्या पैशांची देवाणघेवाण झाल्याचाही अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, या प्रकरणामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. NEET परीक्षा पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यानंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सीने ३ मे रोजी झालेली परीक्षा रद्द केली. आतापर्यंत देशभरातून १६ जणांना अटक करण्यात आली असून, या रॅकेटमध्ये आणखी किती विद्यार्थी, एजंट, डॉक्टर किंवा मध्यस्थ सहभागी आहेत याचा तपास सीबीआय करत आहे.