मुलांच्या शिक्षणाचा बाजार? पुण्यातील 13 शाळा अनधिकृत; पालकांनो सावधान, प्रवेशाआधी मान्यता तपासा!


पुणे : पुण्यात शिक्षणाच्या नावाखाली सुरू असलेल्या काही शाळांमुळे आता विद्यार्थ्यांच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. आकर्षक नावं, इंग्रजी माध्यमाचा गाजावाजा आणि मोठमोठ्या जाहिरातींच्या आड सुरू असलेल्या काही शाळा प्रत्यक्षात अनधिकृत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी शहरातील 13 शाळांना मान्यता नसल्याचं जाहीर करत पालकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

महापालिकेने स्पष्ट केलं आहे की, संबंधित शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होऊ शकते. अशा शाळांमधून मिळणारी प्रमाणपत्रे, पुढील प्रवेश प्रक्रिया आणि शैक्षणिक वैधता याबाबत गंभीर अडचणी निर्माण होण्याची शक्यता असल्याचं प्रशासनाने सांगितलं आहे. त्यामुळे प्रवेश घेण्यापूर्वी शाळेची अधिकृत मान्यता तपासूनच निर्णय घ्यावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.

या यादीत बिबवेवाडी, येरवडा, कोंढवा, हडपसर, लोहगाव, उंड्री आणि आंबेगाव परिसरातील शाळांचा समावेश आहे. शहरात इंग्रजी माध्यमाच्या शाळांची वाढती संख्या आणि पालकांचा कल लक्षात घेऊन अनेक संस्था नियमांचे पालन न करता शिक्षण सुरू करत असल्याचंही समोर आलं आहे.

महापालिका आयुक्त वल किशोर राम यांनी संबंधित शाळा चालकांना कठोर इशारा दिला आहे. आवश्यक त्रुटी तातडीने पूर्ण करून शाळा नियमित करण्याची संधी दिली जाईल. मात्र नियमांचे पालन न करणाऱ्या शाळा चालकांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, संबंधित शाळा चालकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता बहुतांश संस्थांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे. पालकांनी केवळ आकर्षक सुविधा, मोठी इमारत किंवा जाहिरातींवर विश्वास न ठेवता शिक्षण विभागाकडून शाळेची अधिकृत मान्यता तपासावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

पुण्यातील अनधिकृत शाळांची यादी

* न्यू मिलेनियम स्टार इंग्लिश मिडीयम स्कूल, बिबवेवाडी
* महात्मा गांधी प्रशाला, येरवडा
* टीम्स तकवा इस्लामिक स्कूल अ‍ॅण्ड मक्तब, कोंढवा
* सेंट व्ह्यू इंटरनॅशनल स्कूल, कोंढवा
* इमॅन्युअल पब्लिक स्कूल, हडपसर
* आकांक्षा अ‍ॅकॅडमी स्कूल, लोहगाव
* आर्यन पब्लिक स्कूल, मानाजीनगर
* लेगसी हाय स्कूल, कोंढवा
* शिबली नोमानी इंग्लिश मिडीयम स्कूल, कोंढवा
* ऑर्चीड द इंटरनॅशनल स्कूल, उंड्री
* इकरा इस्लामिक स्कूल, कोंढवा
* ग्लोबल इंग्लिश मिडीयम स्कूल, आंबेगाव
* आर्यन वर्ल्ड स्कूल, उंड्री

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!