मोठी बातमी! वादळात अडलं एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर; थोडक्यात बचाव

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरला वादळाचा फटका बसल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र पायलटच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असून हेलिकॉप्टरमधील सर्वजण सुखरूप आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे हे मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथून लग्नसमारंभासाठी मुरबाड येथे जात होते. त्यावेळी कल्याण परिसरात अचानक आलेल्या वादळात त्यांचे हेलिकॉप्टर अडकले. जोरदार वारे आणि खराब हवामानामुळे काही काळ परिस्थिती तणावपूर्ण झाली होती.
समोर आलेल्या माहितीनुसार, तब्बल 10 ते 15 मिनिटे हेलिकॉप्टर वादळाच्या तडाख्यात सापडले होते. मात्र पायलटने प्रसंगावधान राखत परिस्थिती नियंत्रणात ठेवली आणि मोठी दुर्घटना टाळली. त्यानंतर हेलिकॉप्टरचे जुहू विमानतळ येथे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.

सध्या कल्याण-डोंबिवली परिसरात जोरदार वारे आणि बदलत्या हवामानाचा प्रभाव दिसून येत आहे. या अचानक बदललेल्या वातावरणाचा फटका शिंदे यांच्या हेलिकॉप्टरलाही बसल्याची माहिती समोर येत आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
