लोणी काळभोर हादरले! पत्नीला जीवे मारण्याची धमकी; घरातून तलवार जप्त, नेमकं काय घडलं?

लोणी काळभोर : लोणी काळभोरमध्ये पत्नीला जीवे मारण्याची धमकी देत घरात धारदार शस्त्र लपवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गंभीर प्रकरणात पोलिसांनी मध्यरात्री कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले असून मोठा अनर्थ टळला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राजक्ता मनीष पाबळे यांनी त्यांचे पती मनीष बाबुराव पाबळे (वय ४१, रा. पाषाणकर बाग, लोणी काळभोर) यांनी बंदुकीने जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दाखल केली होती. या संदर्भातील व्हॉईस रेकॉर्डिंगही पोलिसांकडे पुरावा म्हणून देण्यात आले होते.
तक्रारीची गंभीर दखल घेत पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मंगळवारी (५ मे) पहाटे सुमारे १.४५ वाजता आरोपीच्या घरावर छापा टाकला. सुरुवातीला आरोपीने झडतीला विरोध करत टाळाटाळ केली, मात्र पोलिसांनी कायदेशीर समज दिल्यानंतर घराची सखोल तपासणी करण्यात आली.

झडतीदरम्यान घरातील लोखंडी कपाटात लपवून ठेवलेली सुमारे ७१ सेंमी लांबीची धारदार लोखंडी तलवार आढळून आली. पोलिसांनी ती तत्काळ जप्त केली आहे.

या प्रकरणी पोलीस अंमलदार निखील श्रीरंग मेमाणे यांच्या फिर्यादीवरून मनीष पाबळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुणे शहर पोलिसांनी जारी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याचाही ठपका ठेवण्यात आला आहे.