लोणी काळभोरमध्ये अवैध दारूवर धडक कारवाई; आई–मुलासह तिघांवर गुन्हा दाखल, ३५० लिटर हातभट्टी दारूचा साठा उद्ध्वस्त


लोणी काळभोर : कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर हातभट्टी दारू व्यवसायावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. छाप्यात तब्बल ३५० लिटर रसायनमिश्रित गावठी दारू नष्ट करण्यात आली असून आई–मुलासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, अक्षय बजरंग मुळेकर (वय २४) आणि त्याची आई मंदा मुळेकर (वय ४७) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच दारू पुरवठादार दादा खलसे (रा. उरुळी कांचन, ता. हवेली) याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार प्रविण दडस यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.

पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने दत्त पार्क परिसरात छापा टाकला. या कारवाईत ३५ लिटर क्षमतेच्या १० प्लास्टिक कॅनमध्ये साठवलेली उग्र वासाची, रसायनमिश्रित गावठी दारू आढळून आली. प्राथमिक तपासात ही दारू आरोग्यास अत्यंत घातक असल्याचे निष्पन्न झाले आहे.

कॅनमधील द्रवाची पाहणी केली असता तीव्र आंबट वास येत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. संभाव्य धोका लक्षात घेऊन १८० मिली दारूचा नमुना जप्त करण्यात आला, तर उर्वरित सर्व दारू पंचांसमक्ष जागीच नष्ट करण्यात आली.

चौकशीदरम्यान आरोपींनी ही दारू दादा खलसे याच्याकडून आणल्याची कबुली दिली आहे. त्यानुसार त्यालाही या प्रकरणात आरोपी करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!