पुण्यात धक्कादायक प्रकार; प्राचार्याला खोट्या गुन्ह्याची धमकी देत 7 लाखांची उकळपट्टी, तीन पोलीस कर्मचाऱ्यांची हकालपट्टी


पुणे : पुणे शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली असून, नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनीच एका महाविद्यालयीन प्राचार्याला धमकावत लाखोंची उकळपट्टी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे पुणे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 55 वर्षीय प्राचार्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवण्यात आली. “तुमच्यावर केस टाकू, अटक करू” अशी धमकी देत आरोपींनी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. अटकेची आणि बदनामीची भीती मनात घर करून बसल्यामुळे प्राचार्यांनी टप्प्याटप्प्याने सुमारे 7 लाख रुपये आरोपींना दिल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, हा प्रकार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर तातडीने चौकशी सुरू करण्यात आली. प्राथमिक तपासात आरोपांमध्ये तथ्य आढळून आल्यानंतर तिघांवर कारवाई करण्यात आली आहे. अजित बडे (पोलीस उपनिरीक्षक), सोनाली हिंगे (दामिनी मार्शल) आणि सुदाम तायडे (पोलीस कर्मचारी) यांचा या प्रकरणात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.

या तिघांवर कठोर कारवाई करत त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले असून, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हा संपूर्ण प्रकार बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या घटनेमुळे पोलीस दलाच्या प्रतिमेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. “ज्यांच्यावर विश्वास ठेवायचा तेच जर असं करत असतील तर सामान्य माणसाने कुणाकडे जावं?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. दोषींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, अशी जोरदार मागणी आता नागरिकांमधून होत आहे.

एकूणच, या प्रकरणामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवरच प्रश्न उपस्थित झाले असून, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!