लोणी काळभोरमध्ये भीषण स्फोट! टँकर वेल्डिंगदरम्यान दुर्घटना; कामगार गंभीर जखमी

लोणी काळभोर : लोणी काळभोर परिसरात मंगळवारी (५ मे) सकाळी एक धक्कादायक घटना घडली. पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत माळी मळा परिसरातील वर्कशॉपमध्ये पेट्रोलजन्य टँकरच्या वेल्डिंगचे काम सुरू असताना अचानक भीषण स्फोट झाला. या स्फोटात एक कामगार गंभीररीत्या भाजला असून त्याच्यावर पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘भारत वेल्डिंग वर्क्स’ या वर्कशॉपमध्ये सकाळी साडेनऊच्या सुमारास टँकर दुरुस्तीचे काम सुरू होते. काम सुरू असतानाच टाकीत साचलेल्या ज्वलनशील वायूमुळे अचानक मोठा स्फोट झाला. स्फोट इतका जोरदार होता की शेडवरील पत्रे तुटून दूरवर फेकली गेली.
या दुर्घटनेत चांद बाबू हा कामगार गंभीर जखमी झाला. स्फोटानंतर तो शेडखाली अडकला होता. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. माजी उपसरपंच राजेंद्र काळभोर, अजय मोरे, अनिरुद्ध मराठे आणि रामा काळे यांनी प्रसंगावधान राखत जखमीला बाहेर काढले आणि रुग्णवाहिकेतून त्वरित रुग्णालयात हलवले.

स्फोटामुळे टँकरचे मोठे नुकसान झाले असून आवाज दूरवरपर्यंत ऐकू गेल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या घटनेत अन्य कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दरम्यान, संबंधित टँकरचा वापर पेट्रोल-डिझेल वाहतुकीसाठी होत होता. टाकीत उरलेल्या ज्वलनशील वायूंमुळे वेल्डिंगदरम्यान ठिणगी पडून हा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, नेमके कारण शोधण्यासाठी अधिक तपास सुरू आहे.