गोकुळ दूध संघावर प्रशासक नियुक्ती; महायुतीत राजकीय भूकंप, मुश्रीफांना मोठा धक्का

कोल्हापूर: राज्यातील अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या गोकुळ दूध संघावर अखेर प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात आली असून या निर्णयामुळे कोल्हापूर जिल्ह्यात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. सातारचे उपनिबंधक संजय कुमार सुद्रिक यांच्या अध्यक्षतेखालील प्रशासक समितीने संघाचा कार्यभार स्वीकारला आहे.

गोकुळ दूध संघाच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत ४ मे रोजी संपताच प्रशासनाने तातडीने प्रशासक नेमणूक केली. या निर्णयाला भाजप समर्थक आमदार शिवाजी पाटील यांचा जोरदार पाठिंबा मिळाला असून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री हसन मुश्रीफ यांना हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
गेल्या काही महिन्यांपासून गोकुळच्या कारभारावरून कोल्हापुरात राजकीय वातावरण तापले होते. आमदार शिवाजी पाटील यांनी मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत नियमबाह्य सभासद नोंदणी आणि आर्थिक अनियमिततेचा मुद्दा उपस्थित केला होता. प्रशासक नियुक्ती व्हावी यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.

दरम्यान, प्रशासक नियुक्ती टाळण्यासाठी मंत्री हसन मुश्रीफ आणि प्रकाश आबिटकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. मात्र शेवटी प्रशासक नेमण्यात आल्याने महायुतीत अंतर्गत तणाव निर्माण झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.

या प्रकरणामुळे शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात कोल्हापूर जिल्ह्यात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. शिंदे गटाने मुश्रीफ यांची बाजू घेतली आहे, तर भाजप आमदार गटाने प्रशासक नियुक्तीचे समर्थन केले आहे.
गोकुळ हा कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख सत्ता केंद्र मानला जात असल्याने या निर्णयाचे परिणाम केवळ दूध संघापुरते मर्यादित राहणार नाहीत, तर आगामी जिल्हा व स्थानिक राजकारणावरही त्याचा मोठा प्रभाव पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.