नसरापूर प्रकरणात ‘रेकॉर्ड ब्रेक’ सुनावणी; आरोपीला फाशी देण्यासाठी सरकारची कडक भूमिक


नागपूर : पुणे जिल्ह्यातील नसरापूर (ता. भोर) येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून केल्याच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले असताना, या प्रकरणात आरोपीला कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. नागपूर येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, या खटल्याची सुनावणी ‘रेकॉर्ड ब्रेक’ वेगाने पूर्ण केली जाईल आणि आरोपीला फाशीची शिक्षा मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.

मुख्यमंत्री म्हणाले की, “मी स्वतः पीडितेच्या वडिलांशी संवाद साधला आहे. नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे आणि तो रास्त आहे. अशा नराधमांना भर चौकात फाशी द्यावी, अशी भावना अनेकांची आहे; मात्र लोकशाही व्यवस्थेत कायद्याच्या चौकटीतच निर्णय घ्यावे लागतात.” त्यांनी यावर भर दिला की, न्यायालयात सरकारची बाजू भक्कमपणे मांडली जाईल, जेणेकरून आरोपीला कोणत्याही तांत्रिक बाबींचा फायदा घेता येणार नाही.

पीडित कुटुंबाच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे असल्याचे सांगत, प्रशासनाकडून लेखी आश्वासनही देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, या घटनेदरम्यान काही व्यक्तींनी परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला. “पीडितेच्या वडिलांनाही अडवण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून योग्य भूमिका घेतली,” असे त्यांनी सांगितले.

तसेच आरोपीचा जुना गुन्हेगारी रेकॉर्ड तपासला जात असून, २०१९ मधील प्रकरणात तो पुराव्याअभावी सुटला होता का, याचीही चौकशी केली जाणार आहे. यावेळी तो कोणत्याही परिस्थितीत सुटणार नाही, यासाठी सरकार दक्ष असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!