बारामतीत उद्या मतमोजणी; प्रशासन पूर्ण तयारीत, सुरक्षा व्यवस्था कडक..

बारामती : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पार पडलेले मतदान आता निर्णायक टप्प्यात आले असून, मतमोजणी सोमवार (दि. ४) रोजी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होणार आहे. ही प्रक्रिया एमआयडीसी, बारामती येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात पार पडणार आहे.

मतमोजणी सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने पार पडावी यासाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे यांनी दिली. या प्रक्रियेसाठी सुमारे ३०० अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मतमोजणी व्यवस्थेत ३० सूक्ष्म निरीक्षक, ३० पर्यवेक्षक आणि ३० सहाय्यकांचा समावेश आहे. ईव्हीएमद्वारे मतमोजणीसाठी २० टेबल, तर पोस्टल मतपत्रिकांसाठी ६ टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील रावडे यांनी सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण दिले आहे.

निकालाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. तसेच, प्रतिबंधात्मक उपाययोजनाही राबविण्यात येणार असून, मतमोजणी केंद्रात केवळ अधिकृत व्यक्तींनाच प्रवेश दिला जाणार आहे.

यावेळी प्रथमच क्यूआर कोड प्रणाली लागू करण्यात आली आहे. सर्व प्रवेशिकांवर क्यूआर कोड देण्यात आला असून, स्कॅनिंगनंतरच प्रवेश दिला जाणार आहे. माध्यम प्रतिनिधींसाठी स्वतंत्र कक्षाची व्यवस्था करण्यात आली असून, फेरीनिहाय निकाल तत्काळ उपलब्ध करून दिला जाणार आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव मतमोजणी केंद्रात मोबाईल वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. संपूर्ण प्रक्रिया काटेकोर आणि नियमबद्ध पद्धतीने पार पडणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.