AC ब्लास्टचा धोका! एका छोट्या चुकीमुळे ९ जणांचा मृत्यू? जाणून घ्या काळजी कशी घ्यावी

दिल्ली : दिल्लीत भीषण आगीच्या घटनेत ९ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एसी (एअर कंडिशनर) ब्लास्टमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात असून परिसरात खळबळ उडाली आहे. याआधीही एसी स्फोटाच्या घटना घडल्याने सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

एसी आपल्याला थंडावा देतो, मात्र त्याच एसीचा स्फोट कसा होतो, हा प्रश्न अनेकांना पडतो. तज्ज्ञांच्या मते, वापरातील काही सामान्य चुका यासाठी कारणीभूत ठरू शकतात.
उन्हाळ्यात घरातील तापमान मोठ्या प्रमाणात वाढते. अशा वेळी एसीचा कम्प्रेसर जास्त गरम होऊ शकतो. त्यामुळे एसीचा बाहेरील युनिट थेट उन्हात न ठेवता सावलीत ठेवणं आवश्यक आहे. तसेच, बाहेरील युनिटवर हलक्या पाण्याचा शिडकावा किंवा ओल्या कापडाने स्वच्छता केल्यास तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते. मात्र, हे करताना एसी पूर्णपणे बंद ठेवणं गरजेचं आहे.

एसी सुरू असताना कम्प्रेसर गॅस कम्प्रेस करत असतो. सतत वापर, खराब व्हेंटिलेशन, घाणेरडे फिल्टर किंवा कॉइल यामुळे कम्प्रेसरवर ताण वाढतो आणि तापमान व प्रेशर वाढून स्फोटाचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नियमित सर्व्हिसिंग अत्यंत महत्त्वाची आहे.

रात्रभर एसी चालू ठेवणं टाळा : अनेकजण एसी सतत चालू ठेवतात, जे धोकादायक ठरू शकतं. मशीनवर सतत ताण आल्याने बिघाड किंवा स्फोटाचा धोका वाढतो. टायमरचा वापर करून एसीला मधूनमधून विश्रांती देणं योग्य ठरेल.
टर्बो मोडचा वापर मर्यादित ठेवा : टर्बो मोडमध्ये एसी जास्त क्षमतेने काम करतो. मात्र, दीर्घकाळ हा मोड वापरल्यास मशीनवर अतिरिक्त दाब येऊ शकतो.
नियमित स्वच्छता आणि सर्व्हिसिंग आवश्यक :
दर ७ ते १५ दिवसांनी एसीचा फिल्टर स्वच्छ करावा. स्प्लिट एसी असल्यास आतील आणि बाहेरील दोन्ही युनिटची काळजी घ्यावी. तज्ज्ञांच्या मते, सुमारे ६०० तासांच्या वापरानंतर एसी सर्व्हिसिंग करणं आवश्यक आहे.
एसी योग्य थंडावा देत नसेल, गॅस गळती होत असेल किंवा इतर बिघाड जाणवत असल्यास तात्काळ दुरुस्ती करून घ्यावी. तसेच, फॉल्टी वायरिंग किंवा चुकीच्या इन्स्टॉलेशनमुळे शॉर्ट सर्किट होण्याचा धोका असतो, त्यामुळे वायरिंग, स्विचबोर्ड आणि प्लगची तपासणी करणंही गरजेचं आहे.