विधान परिषद निवडणूक बिनविरोध; ९ उमेदवार रिंगणात, वाचा नावांची यादी…

पुणे : विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. अखेरच्या दिवशी राजकीय घडामोडींना वेग आला होता. या निवडणुकीत एकूण ९ जागांसाठी ९ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यामुळे निवडणूक बिनविरोध होणार आहे.

९ जागांच्या कोट्यात भाजपच्या वाट्याला ५ जागा आल्या असून, पक्षाच्या पाचही उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. तर शिवसेना शिंदे गटाकडून २, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) कडून प्रत्येकी १ उमेदवार रिंगणात उतरला आहे.
भाजपकडून अतिरिक्त उमेदवार दिला जाऊ शकतो, अशी चर्चा होती. मात्र, अतिरिक्त उमेदवार न दिल्यामुळे समीकरण स्पष्ट झाले आणि निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला.

दरम्यान, शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांचे नावही चर्चेत होते. त्यांनी उमेदवारी दिल्यास इतर पक्ष उमेदवार देणार नाहीत, अशी भूमिका काही पक्षांनी घेतली होती. मात्र, अखेर ठाकरे गटाकडून अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.

काँग्रेसने दानवे यांना पाठिंबा दर्शवला असून, भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून अतिरिक्त उमेदवार न आल्याने निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भाजपकडून सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर प्रज्ञा सातव या पोटनिवडणूक लढवणार आहेत.
शिवसेना शिंदे गटाकडून नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून झिशान सिद्दिकी, तर शिवसेना (ठाकरे गट) कडून अंबादास दानवे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अतिरिक्त उमेदवार न आल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे निश्चित झाले आहे.