पुरंदर विमानतळासाठी जमिनीला एकरी दर निश्चित; आकडा ऐकून थक्क व्हाल

पुणे : प्रस्तावित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया वेगाने सुरू झाली असून, सरकारकडून जमिनीचा दर निश्चित करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीला एकरी सुमारे दीड कोटी रुपये दर देण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

ज्या शेतकऱ्यांनी संमतीपत्रे दिली आहेत, त्यांच्या जमिनीची मोजणी प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. येत्या सहा महिन्यांत भूसंपादनाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर पुढील महिन्यापासून भूसंपादन सुरू करण्यात येणार आहे. ४ मेपासून मोबदला देऊन जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

यापूर्वी मुंजवडी, उदाची वाडी आणि एकेतपूर या गावांमध्ये मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. विमानतळासाठी सुमारे ३,००० एकर जमीन संपादित करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे.

भूसंपादनासाठी ‘हुडको’कडून सुमारे ६,००० कोटी रुपयांचे कर्ज घेण्यास सरकारने मान्यता दिली असून, त्यातील काही निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे आता प्रक्रिया अधिक वेगाने राबवली जात आहे.
भूसंपादन करताना केवळ जमीनच नव्हे, तर रहिवासी घरे, झाडे, विहिरी आणि फळबागांचेही मूल्यांकन करून त्यानुसार योग्य मोबदला देण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.