सरपंच निवडणुकीत रुपाली चाकणकर यांना मोठा झटका; सख्ख्या भावाचा दारुण पराभव…

पुणे : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल समोर येत असून काही ठिकाणी धक्कादायक निकाल लागले आहेत. बीडच्या मस्साजोग येथे दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा ९२ मतांनी पराभव झाल्यानंतर आता आणखी एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे.

रुपाली चाकणकर यांचे सख्खे बंधू संतोष बोराटे यांचाही सरपंचपदाच्या निवडणुकीत दारुण पराभव झाला आहे. पुण्यातील दौंड तालुक्यातील नांदूर ग्रामपंचायतीची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत सरपंचपदासाठी अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली.
मात्र या लढतीत संतोष बोराटे यांना पराभवाचा सामना करावा लागला. या निवडणुकीत उमेदवार विशाल नरेंद्र थोरात यांनी तब्बल ३०४ मतांनी विजय मिळवत सरपंचपदावर आपली मोहर उमटवली.

थोरात यांच्या या विजयामुळे स्थानिक पातळीवर मोठी राजकीय उलथापालथ झाल्याचे मानले जात आहे, तर दुसरीकडे हा पराभव रुपाली चाकणकर यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
