‘छत्रपती शिवाजी महाराज युद्धात थकले अन् रामदास स्वामींना…’ बागेश्वर बाबांचे वक्तव्य; राज्यभर संताप, मोठा वाद

नागपूर : धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबाबत त्यांनी सांगितलेल्या कथनावरून राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा रंगली आहे.

ही घटना नागपूर येथे झालेल्या भारदुर्गा शक्तिस्थळ शिलान्यास कार्यक्रमात घडली. या कार्यक्रमाला मोहन भागवत, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आपल्या भाषणात बागेश्वर बाबांनी छत्रपती शिवाजी महाराज युद्धामुळे थकले होते आणि त्यांनी राज्यकारभार समर्थ रामदास स्वामी यांच्याकडे सोपवण्याची इच्छा व्यक्त केली, असे कथन सांगितले. त्यानंतर गुरु-शिष्य संवादाचा उल्लेख करत त्यांनी रामदास स्वामींनी पुन्हा महाराजांना जबाबदारी स्वीकारण्यास सांगितल्याचे म्हटले.

दरम्यान, अलीकडेच संजय गायकवाड यांनी ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकावरून प्रकाशकाला धमकी दिल्याच्या वादाची पार्श्वभूमी असताना या वक्तव्यामुळे नव्याने चर्चा पेटली आहे.

याशिवाय, चार मुलं जन्माला घाला आणि त्यातील एक स्वयंसेवक संघाला द्या, असे आवाहनही बागेश्वर बाबांनी केले. त्यांच्या या वक्तव्यावरून विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत.