पुणे रिंगरोडला पश्चिमला २५ टक्के काम; पूर्व टप्प्या मात्र ० टक्के पण नाही! पूर्व टप्प्याने पुणे-सोलापूर राष्ट्रीय मार्ग होणार बेहाल…

जयदिप जाधव

उरुळी कांचन : पुणे व पिंपरी चिंचवड शहराची वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी राज्य शासनाने महत्वकांक्षी प्रकल्प ठरविलेल्या व शासनाने कोट्यावधींचा निधी खर्चून भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्षात रिंग रोडची उभारणी करण्यासाठीचे शिवधनुष्य उचललेल्या पुणे रिंग रोडच्या पूर्व भागातील एका टप्प्यासाठी नियुक्त केलेल्या एका ठेकेदार कंपनीने अद्याप कामच सुरू केले नसल्याने राज्य शासनाने राणाभिमदेवी थाटात डिसेंबर २०२७ पर्यंत काम पूर्ण करण्याची आरोळी हवेत विरण्याची शक्यता आहे.
पश्चिम भागात प्रत्यक्ष प्रकल्पाचे काम २५ टक्के पूर्ण झाले असताना पूर्व भागात एका टप्प्याचे काम ० टक्कानेही पुढे न सरकल्याने या ठिकाणी प्रकल्पाच्या दिरंगाईचे झटके नागरीकांना सोसावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पुणे रिंग रोडच्या पूर्व टप्प्यातील ७१.३५ किलोमीटर टप्प्यातील सोरतापवाडी (हवेली) ते शिवरी (भोर) टप्प्यातील रिंग रोडचे काम शून्य टक्के प्रगतीपथावर असल्याची आवस्था आहे. तर पश्चिम भागातील टप्प्यातील कामे साधारण २० ते २५ टक्के पूर्ण करण्याच्या दृष्टीक्षेपात आहे. अशावेळी पूर्ण टप्प्यातील कामांना दिरंगाई का असा सवाल निर्माण होत असून वाहतुक कोंडीने भरडलेल्या पूर्व भागातील उपनगर तसेच हवेली व दौंड तालुक्याला दिलासा कधी मिळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे

राज्य शासनाने पुणे व पिंपरी चिंचवड शहराची वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी महत्वकांक्षी प्रकल्प केलेल्या पुणे बाह्रय रिंगरोडची कामासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे रिंगरोडच्या कामाची जबाबदारी दिली आहे. त्यानुसार या रिंग रोडसाठी नामांकित कंपन्यांना ९ टप्यातील कामांची नियुक्ती केली आहे.
त्यानुसार सोरतापवाडी ते शिवरे या टप्प्यातील ३३ किलोमीटर कामासाठी रोडवेझ सोल्यूशन या ठेकेदार एजन्सीची नियुक्ती झाली असून प्रत्यक्षात काम सुरुच झाले नसल्याची आवस्था आहे. या दरम्यानच्या टप्प्यात फक्त भूसंपादन क्षेत्राची हद्द निश्चितीपलिकडे कामच होऊ न शकल्याने रिंग रोडच्या कामाला चांगलेच ग्रहण लागले असून हडपसर ते यवत उन्नत मार्गाच्या उभारणीला वाहतुक कोंडी थोपविण्यासाठी हा विकसित होणारा महत्त्वाची भूमिका बजावू शकतो परंतु ती शक्यता आद्याप शून्य टक्के कामाने फोल ठरणार आहे.
“या टप्प्यात भूसंपादन प्रक्रियेसह मार्ग विकसित करण्याची सर्व कार्यवाही पूर्ण झाली आहे. ‘एमएसआरडीसी’ कडून सद्यस्थितीत मिसिंग लिंक प्रकल्प १ मे रोजी वाहतुकीला खुला करण्याचे नियोजन सुरू असल्याने पुढील महिन्यात बैठका घेऊन या टप्प्याचे कामात काय त्रुटी शोधण्यात येईल”
-राहुल वसईकर, अधिक्षक अभियंता, एमएसआरडीसी