मोठा बदल! गॅस सिलिंडर घेण्यासाठी ‘हा’ नंबर आवश्यक; नाहीतर डिलिव्हरी नाही…

नवी दिल्ली : अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील वाढत्या संघर्षामुळे जागतिक स्तरावर उर्जासंकट निर्माण झाले असून त्याचा फटका भारतालाही बसत आहे. देशात घरगुती एलपीजी सिलिंडरचा तुटवडा जाणवू लागला आहे. आखाती देशांतून येणाऱ्या नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे.

या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी नागरिकांना वेळेवर गॅस सिलिंडर मिळत नसून, बुकिंग केल्यानंतरही चार ते सात दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. काही ठिकाणी तर या परिस्थितीचा गैरफायदा घेत गॅस सिलिंडरचा काळाबाजारही सुरू असल्याचे समोर आले आहे, ज्यामुळे सामान्य नागरिकांची लूट होत आहे.
या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकारने आता मोठा निर्णय घेतला असून, गॅस सिलिंडर बुकिंग आणि डिलिव्हरी प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. गॅस सिलिंडर बुकिंगदरम्यान होणारा काळाबाजार रोखण्यासाठी सरकारने नवा नियम लागू केला आहे.

आता गॅस बुक केल्यानंतर प्रत्येक वेळी ग्राहकांना (डिलिव्हरी ऑथेंटिफिकेशन कोड) नंबर दिला जाणार आहे. गॅसची डिलिव्हरी घेताना हा DAC नंबर डिलिव्हरी बॉयला देणे अनिवार्य असेल. हा कोड नसल्यास गॅस सिलिंडर मिळणार नाही.

हा नियम आधीच लागू झाला असून देशातील सुमारे 92 टक्के गॅस डिलिव्हरी याच पद्धतीने केली जात आहे. दरम्यान, DAC प्रक्रियेत अलीकडे काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या, त्यावर सुधारणा करत नवीन अपडेट करण्यात आले आहे. या अपडेटमुळे गॅस डिलिव्हरीची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक होणार आहे.