आज गेम वाजवायचा, कदमवाकवस्तीच्या हॉटेलमध्ये पिस्तूल, चाकूसह गुंडांची दहशत; चौघांवर गुन्हा दाखल…

लोणी काळभोर : निलेश काळभोर याचा आज गेम वाजवायचा असा आरडाओरडा करत चार जणांनी एका हॉटेलमध्ये पिस्तूल, चाकूसह दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी हॉटेल व्यावसायिक सुर्यकांत बापुसाहेब उंद्रे (वय ४०, रा. मांजरी खुर्द) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अस्लम अल्ताफ शेख, पम्या, आकाश (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) व एका अनोळखी इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर प्रकार हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील माईलस्टोन 09 या हॉटेलमध्ये रविवार (१९ एप्रिल) रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घडला आहे. उंद्रे यांनी शनिवारी नेहमीप्रमाणे शनिवारी रात्री ११ वाजता हॉटेल बंद केले.

त्यानंतर ते व हॉटेल व्यावस्थापक नितेश हेगडे किचनमध्ये साफसफाई करत होते. रविवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास चार अनोळखी इसमांनी सुरक्षारक्षकाला धमकावत गेट उघडण्यास भाग पाडले आणि आत प्रवेश केला. हॉटेलमध्ये घुसताच त्यांनी “निलेशदादा काळभोर कुठे आहेत?” अशी विचारणा करत संपूर्ण हॉटेलची झडती घेण्यास सुरुवात केली. उंद्रे यांनी हॉटेल बंद आहे, आत कोणी नाही असे सांगूनही त्यांनी ऐकले नाही.

यावेळी एकाच्या हातात चाकू होता. उंद्रे व हेगडे यांनी समजावून सांगितले व त्यांना बाहेर काढले. बाहेर जात असतानाच जर्किन घातलेला एकजण आत आला. त्याच्या हातात पिस्तूल होते. त्याने उंद्रे यांचे नाव विचारले आणि स्वतःचे नाव अस्लम अल्ताफ शेख असल्याचे सांगितले. यानंतर त्याने निलेश काळभोरचा आज गेम वाजवायचा होता. असे सांगितले व सर्वजण बाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये बसून निघून गेले.
ते निघून गेल्यानंतर उंद्रे यांनी तत्काळ ११२ या आपत्कालीन क्रमांकावर कॉल करून पोलिसांना माहिती दिली. लोणी काळभोर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.