‘ड्रीम होम’साठी ६० लाख घेतले… अन् मग भलताच ‘गेम’! पुण्यात बिल्डरने महिलेला गोड बोलून फसवलं

पुणे : पुणे शहरात स्वतःच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या मध्यमवर्गीयांची फसवणूक होण्याच्या घटना वाढतच आहेत. कोंढवा परिसरातून अशाच प्रकारची धक्कादायक घटना समोर आली आहे. आयुष्यभराची बचत करून घर घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका महिलेला ६० लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे.

कोंढव्यातील एका बांधकाम प्रकल्पात सदनिका देण्याचे आमिष दाखवून आरोपींनी महिलेची मोठी फसवणूक केली. पैसे स्वीकारल्यानंतरही संबंधित सदनिका दुसऱ्यालाच विकण्यात आल्याचे समोर आले असून, बिल्डरने जबाबदारी झटकली आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून कोंढवा पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोंढवा बुद्रुक येथील ‘निर्माण इस्ट्रेला’ या बांधकाम प्रकल्पात हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी खदिजा अब्दुलहुसेन खेडवाला (वय ४५) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपींनी फिर्यादी महिलेचा विश्वास संपादन करून त्यांना सदनिका देण्याचे आश्वासन दिले होते. आरोपींनी खदिजा यांच्याकडून सदनिकेच्या नावाखाली वेळोवेळी रोख रक्कम आणि धनादेशाद्वारे एकूण ६० लाख रुपये स्वीकारले. मात्र, इतकी मोठी रक्कम घेऊनही आरोपींनी सदनिकेचा अधिकृत करार करण्यास टाळाटाळ केली. ही टाळाटाळ करण्यामागे आरोपींचा मोठा डाव होता, जो नंतर उघडकीस आला.

फिर्यादी महिलेकडून तब्बल ६० लाख रुपये उकळूनही आरोपींनी तीच सदनिका कोणतीही पूर्वसूचना न देता दुसऱ्या व्यक्तीला विकून टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. इतकेच नव्हे, तर संबंधित सदनिकेवर बँकेकडून कर्ज उचलून महिलेची दुहेरी आर्थिक फसवणूक करण्यात आली. आपली मोठी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधित महिलेने तातडीने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली असून या प्रकरणाने खळबळ उडाली आहे.