आगामी शैक्षणिक वर्षापासून पदवी अभ्यासक्रमाचे चौथे वर्ष लागू करण्यास मान्यता! चंद्रकांत पाटील यांची मोठी घोषणा


पुणे : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक मोठी घोषणा केली आहे. आता उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या शासन निर्णयानुसार, राज्यातील सर्व विद्यापीठे तसेच संलग्न आणि स्वायत्त महाविद्यालयांमध्ये आगामी शैक्षणिक वर्षापासून पदवी अभ्यासक्रमाचे चौथे वर्ष लागू करण्यास मान्यता दिली आहे.

यामुळे हा बदल आता होणार आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयांमध्ये योग्य ती जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने आयोजित चर्चासत्रात सहभागी होत त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.

चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमातील ‘ऑनर्स’ व ‘ऑनर्स विथ रिसर्च’च्या चौथ्या वर्षाच्या अंमलबजावणी संदर्भात उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि उच्च शिक्षण संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील सर्व वरिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य, संचालक व प्राध्यापकांसाठी तीन दिवसीय विशेष ऑनलाईन प्रशिक्षण सत्र आयोजित केले आहे.

या प्रशिक्षणात सर्व संबंधितांनी सक्रिय सहभाग नोंदवणे आवश्यक आहे, असे यावेळी स्पष्ट केले. उच्च शिक्षण अधिक गुणवत्तापूर्ण, संशोधनाभिमुख आणि विद्यार्थी- केंद्रित करण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल, असा मला विश्वास असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले आहे.

दरम्यान, या चर्चासत्रास अपर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी, राज्य सुकाणू समितीचे सदस्य प्रा. डॉ. रवींद्र कुलकर्णी यांच्यासह राज्यातील सर्व वरिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य, संचालक आणि प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निर्णयामुळे आगामी काळात शिक्षण क्षेत्रात मोठा बदल दिसणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!