पुण्यात मोठा रॅकेट उघड! घरगुती गॅसची बेकायदेशीर विक्री, १०३ सिलेंडर्स जप्त…


पुणे : अमेरिका-इराण युद्धाचा फटका भारतातील एलपीजीच्या गॅस पुरवठ्याला बसला. त्यानंतर संपूर्ण देशभरात गॅस टंचाईची समस्या निर्माण झाली होती. परंतु, मागली काही दिवसांपासून कमर्शियल आणि घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत असल्याचं सरकारकडून सांगण्यात येतंय.

दुसरीकडे गॅस सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. पुणे शहरातील हांडेवाडी परिसरात घरगुती गॅस सिलेंडर्सचा अवैध साठा करून त्याचा काळाबाजार करणाऱ्या एका मोठ्या अड्ड्यावर काळेपडळ पोलिसांनी छापा टाकला आहे.

या कारवाईत पोलिसांनी १०३ सिलेंडर्ससह सुमारे १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. शहरातील अवैध धंद्यांविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेदरम्यान पोलीस अंमलदार महादेव शिंदे यांना हांडेवाडी परिसरात गॅसची अवैध रिफिलिंग होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.

दरम्यान, या माहितीच्या आधारे ‘काव्या मल्टी सर्व्हिसेस’ या दुकानावर छापा टाकला असता, तिथे उभ्या असलेल्या टेम्पोमध्ये आणि दुकानामध्ये घरगुती व व्यावसायिक गॅस टाक्यांचा मोठा साठा आढळून आला.

पोलिसांनी धाड टाकली तेव्हा आरोपी नितीन हनुमंत होळकर (वय ३८, रा. हांडेवाडी) हा घरगुती गॅस सिलेंडर्समधून व्यावसायिक आणि ५ किलोच्या छोट्या टाक्यांमध्ये अत्यंत धोकादायक पद्धतीने गॅस ट्रान्सफर करत असल्याचे उघड झाले. यामुळे परिसरात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. आरोपीकडे या व्यवसायाचा किंवा साठवणुकीचा कोणताही परवाना नव्हता.

पोलिसांनी एकूण १०३ गॅस सिलेंडर्स आणि गुन्ह्यात वापरलेला टेम्पो असा मिळून १० लाख ९ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नितीन हनुमंत होळकर याला अटक करण्यात आली आहे. आरोपीविरोधात काळेपडळ पोलीस ठाण्यात अत्यावश्यक वस्तू अधिनियमाच्या कलम ३ आणि ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!