शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट!सातबारा आणि 8 अ उतारे थेट व्हॉट्सअॅपवर उपलब्ध होणार..

पुणे : राज्यातील नागरिकांसाठी भूमी अभिलेख विभागाने मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. मागील काही वर्षापासून सातबारा उताऱ्यासह आवश्यक असलेले उतारे ऑनलाइन मिळत होते. यानंतर आता शेतकऱ्यांना हे सातबारा आणि आठ अ उतारे थेट व्हाट्सअपच्या माध्यमातून मिळणार आहेत. ही सुविधा महाभूमी संकेतस्थळावरून थेट मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

भूमी अभिलेख विभागाने शेतकऱ्यांसाठी केलेल्या नवीन सुविधेनुसार, नागरिकांनी महाभूमी पोर्टलवर आपला मोबाईल क्रमांक नोंदवला की, सातबारा आणि ८ अ उतारा थेट त्यांच्या व्हॉट्सअॅपवर पाठवला जाणार आहे. त्यामुळे कागदपत्रे मिळवण्यासाठी कुठेही जाण्याची गरज राहणार नाही. त्यानुसार उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र,जन्ममृत्यू दाखला, जात प्रमाणपत्र, विवाह प्रमाणपत्र तसेच शैक्षणिक प्रमाणपत्र उपलब्ध होणार आहे.
महाभूमी संकेतस्थळाच्या माध्यमातून ही सेवा मोबाईलवर मिळणार असून, नागरिकांना माफक शुल्कात नोंदणी करून या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. ही सेवा सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर सुरू होणार असून, पुढे ती संपूर्ण राज्यात टप्प्याटप्प्याने लागू केली जाणार आहे..

या सुविधेचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे जमिनीच्या नोंदीत होणाऱ्या बदलांची माहिती देखील व्हॉट्सअॅपवर मिळणार आहे. जमिनीची मोजणी, फेरफार, नकाशातील बदल यासंदर्भातील सूचना थेट संबंधितांना पाठवण्यात येणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीबाबत सतत अद्ययावत माहिती मिळेल. या प्रकारामुळे गैरवापराला आळा बसणार आहे.

दरम्यान सध्या उतारे डाउनलोड करून पेनड्राईव्हद्वारे देण्याची पद्धत असल्यामुळे त्याचा गैरवापर होण्याची शक्यता असते. मात्र व्हॉट्सअॅपवर थेट कागदपत्रे मिळाल्यामुळे त्याची सुरक्षितता वाढणार आहे आणि गैरवापराला आळा बसणार आहे. तसेच संबंधित व्यक्तीला हे दस्तऐवज कधीही आणि कुठेही वापरता येतील. यामुळे अधिक पारदर्शक आणि नागरिकाभिमुख होण्यास मदत होणार आहे.