धक्कादायक! प्रेमसंबंधातून वाद; महिलेचे खासगी फोटो व्हायरल करून बदनामी, लोणी काळभोर येथील घटना…


लोणी काळभोर : प्रेमसंबंधातून झालेल्या वादातून एका महिलेचे खासगी फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून तिची व कुटुंबाची बदनामी केल्याप्रकरणी एका आरोपीला हिंगोली येथून अटक करण्यात आली आहे. शुक्रवार (१० एप्रिल) रात्री सुमारे दहा वाजता ही कारवाई करण्यात आली. न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३७ वर्षीय महिलेच्या फिर्यादीवरून सुनिल रामप्रसाद मुटकुळे (रा. अकोले, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) याला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे.

पीडित महिला हॉटेलमध्ये चपाती बनवण्याचे काम करतात, तर त्यांचे पती चारचाकी वाहन चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. २०१७ मध्ये हॉटेलमध्ये काम करत असताना त्यांची आरोपीशी ओळख झाली आणि त्यानंतर त्यांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. काही काळानंतर आरोपी गावी गेला, मात्र दोघांमध्ये फोनवर संपर्क सुरूच होता. २०२१ मध्ये कौटुंबिक वादानंतर पीडिता आरोपीकडे संभाजीनगर येथे गेल्या आणि सुमारे चार वर्षे त्याच्यासोबत राहिल्या. या काळात आरोपीने तिच्या परवानगीशिवाय खासगी फोटो व व्हिडिओ चित्रीत केल्याचा आरोप आहे.

फेब्रुवारी २०२६ मध्ये पीडिता पुन्हा पतीकडे परतल्यानंतर आरोपीने सूडाच्या भावनेतून सोशल मीडियावर ५ ते ६ बनावट इन्स्टाग्राम अकाउंट तयार करून तिचे फोटो व व्हिडिओ व्हायरल केले. हे फोटो नातेवाईकांपर्यंत पोहोचवण्यात आल्याने तिची व कुटुंबाची मोठ्या प्रमाणात बदनामी झाली.

सुरुवातीला बदनामीच्या भीतीने पीडितेने मौन बाळगले, मात्र त्रास वाढत गेल्याने त्यांनी अखेर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गुन्हा नोंद होताच पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचे लोकेशन शोधून हिंगोली येथून त्याला अटक केली.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश बोराटे, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के तसेच इतर पोलिस कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!