लोणीकाळभोरमध्ये मोलमजुरी करणाऱ्या आई-वडिलांची लेक बनली पोलिस कॉन्स्टेबल; दहा बाय दहाच्या भाड्याच्या खोलीतून उजळलं यशाचं स्वप्न..


लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती येथे भाजी विक्री करणारे वडील आणि शेतमजुरी करणारी आई अशा साध्या कुटुंबातून आलेल्या मोनाली गोविंद जाधव हिने जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमांच्या जोरावर पुणे शहर पोलीस दलात कॉन्स्टेबल पद मिळवत कुटुंबाचे स्वप्न साकार केले आहे.

घोरपडेवस्ती येथील राजगृह कॉलनीत दहा बाय दहाच्या भाड्याच्या खोलीत मोनाली कुटुंबासह राहते. आर्थिक परिस्थिती बेताची असताना तिच्या आई-वडिलांनी मुलीच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. वडील गोविंद दिवस-रात्र कष्ट करून भाजी विक्रीचा व्यवसाय करत कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, तर आई रेखा शेतात मजुरी करून संसाराला हातभार लावतात. अशा संघर्षमय वातावरणात वाढलेल्या मोनालीने लहानपणापासूनच ‘पोलीस व्हायचे’ हे स्वप्न मनाशी बाळगले होते.

मोनालीचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण लोणी काळभोरमध्येच झाले. सध्या ती हडपसर येथील एस. एम. जोशी विद्यालयात कला शाखेच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत आहे. पोलीस भरती प्रक्रियेबद्दल महाविद्यालयातील मित्रमैत्रिणींच्या मार्गदर्शनातून तिने या माहिती घेतली आणि त्यासाठी तयारी सुरू केली. व प्रशिक्षणासाठी श्री अकॅडमीत प्रवेश घेतला. सकाळी लवकर उठून धावणे, व्यायाम, शारीरिक कसरती आणि दिवसभर अभ्यास असा तिचा कठोर दिनक्रम सुरू झाला.

घरची जबाबदारी व शिक्षण सुरू ठेवत तिने कोणतीही तडजोड न करता स्वतःला पूर्णपणे तयारीत झोकून दिले. या मेहनतीचे फळ तिला पुणे शहर पोलीस भरती प्रक्रियेत मिळाले. शारीरिक क्षमता चाचणीत तिने ५० पैकी ४७ तर लेखी परीक्षेत १०० पैकी ७९ गुण मिळवले. एकूण १२६ गुणांसह खुल्या प्रवर्गातील १२५ गुणांच्या मेरिटमध्ये स्थान मिळवत तिने पोलीस कॉन्स्टेबल पदाला गवासनी घातली.

यावेळी बोलताना मोनाली म्हणाली,माझ्या यशामागे माझ्या आई-वडिलांचे मोठे योगदान आहे.त्यांनी खूप कष्ट केले, त्याग केला. कोणतेही स्वप्न पूर्ण करायचे असेल तर त्यासाठी सातत्याने मेहनत आणि चिकाटी आवश्यक असते. अपयश आले तरी हार मानू नका. प्रामाणिक प्रयत्न करत राहिलात,तर यश नक्की मिळते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!