LPG -PNG ची चिंता मिटली! इराण – इस्त्राईलच्या युद्धविरामानंतर गॅस पुरवठा सुरळीत, केंद्र सरकारचा मोठा खुलासा..

पुणे: गेल्या अनेक महिन्यापासून सुरू असलेल्या इराण आणि इस्रायल युद्धाने जगभरात थैमान घातले होते. अखेर या युद्धाला पूर्णविराम मिळाल्यानंतर भारतात LPG, PNG, पेट्रोल-डिझेल पुरवठ्यावर केंद्र सरकारने महत्वाची माहिती दिली आहे. सरकारकडून इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची टंचाई नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, देशात दररोज सुमारे 1 लाख एलपीजी सिलेंडरची विक्री होत असून पुरवठा पूर्णपणे सुरळीत आहे. एलपीजी विक्रेत्यांकडे,पेट्रोल पंपाकडे पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही कमतरतेची नोंद नाही.तसेच 98% एलपीजी बुकिंग ऑनलाइन होत असून घरगुती गॅसचा पुरवठा ही नियमित सुरळीत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
इराण आणि इस्राईलच्या युद्धामुळे सामान्य नागरिकांना गॅसचा,पेट्रोल- डिझेलचा कोणताही तुटवडा झालेला नाही. मंत्रालयाने असे स्पष्ट केले आहे की,14 मार्चपासून आतापर्यंत सुमारे 1 लाख 6 हजार टन एलपीजीची विक्री झाली असून दररोज 6 ते 6.5 हजार टन विक्री होत असल्याची माहिती देण्यात आली. हळूहळू सर्व व्यवहार पूर्वपदावर येत आहेत.

या युद्धाची झळ भारतीयांना बसू नये म्हणून ओळखपत्राशिवायही या सिलेंडरचा पुरवठा दुप्पट करण्यात आला आहे. दररोज सुमारे 1 लाख 5 किलो सिलेंडर विकले जात असून 23 मार्चपासून आतापर्यंत 11 लाख सिलेंडरची विक्री झाली आहे.5 किलोच्या एलपीजी सिलेंडरबाबतही सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या या स्पष्टीकरणामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.
