नितीश कुमार यांनी घेतली राज्यसभा खासदार म्हणून शपथ; मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार?

पुणे : जेडीयु नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज संसद भवनात राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली.उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती सी.पी राधाकृष्णन यांनी नितीश कुमार यांना शपथ दिली. त्यांनी अद्याप बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नसला तरी त्यांच्या राज्यसभेच्या शपथेमुळे मुख्यमंत्र्यांपदी नव्या चेहऱ्याची वर्णी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्यसभेवर निवडून आल्यानंतरही नितीश कुमार सहा महिन्यापर्यंत बिहारचे मुख्यमंत्री म्हणून कायम राहू शकतात. मात्र नियमानुसार खासदार म्हणून निवडून आल्यानंतर 14 दिवसाच्या आत त्यांना विधान परिषद सदस्य पदाचा राजीनामा देणे बंधनकारक आहे.जे त्यांनी 30 मार्च रोजी केले होते. त्यानंतर आज त्यांनी राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतल्यानंतर ते संसद भवनातून थेट आपल्या दिल्लीतील कामराज लेनस्थित निवासस्थानी रवाना झाले.
राज्यसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतल्यानंतर आगामी काही दिवसांत ते बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील, असे नितीश कुमार यांनी काल स्पष्ट केले आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर बिहारमध्ये नवे सरकार स्थापन होईल. त्यांच्या शपथविधी वेळी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे अनेक प्रमुख नेते, तसेच बिहारचे दोन्ही उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा हे देखील उपस्थित होते.

दरम्यान नितीश कुमार यांनी शपथ घेतल्यानंतर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतील. या बैठकीत बिहारचे नवे मुख्यमंत्री आणि नव्या सरकारच्या स्थापनेबाबत चर्चा होऊ शकते. यामुळे बिहारच्या नव्या सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.
