मस्साजोगमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ! दिवंगत सरपंच देशमुखांच्या घरी घरफोडी, 6-7 घरावरही डल्ला..

पुणे : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीडमध्ये गुन्हेगारी घटनांनी थैमान घातले आहे. अशातच आता पुन्हा एकदा मस्साजोग चर्चेत आले आहे.दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्यासह गावातील अनेकांच्या घरी घरफोडी झाल्याचे समोर आले आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख, पत्नी अश्विनी देशमुख,आई आणि कुटुंबातील सर्व सदस्य झोपलेले असताना हा प्रकार घडला आहे.धनंजय देशमुख यांच्या घरासह अनेक ठिकाणी घरफोडी केली तर तलावाच्या परिसरात असलेले कॉपर केबल चोरून नेले आहे. या घटनेची माहिती सकाळी समजताच पोलिसांना देण्यात आली. या प्रकरणाचा पोलिसांकडून वेगाने तपास सुरू करण्यात आला आहे.
संपूर्ण घटनेचा तपास करण्यासाठी केज पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक, श्वानपथक आणि फॉरेन्सिक टीम देखील मस्साजोग परिसरात दाखल झाली असून तपास सुरू करण्यात आला आहे.चोरीच्या या घटनेबाबत बोलताना धनंजय देशमुख यांनी सांगितले की, गावातील 7 ते 8 ठिकाणी घरफोडी झाली. आमच्या घरातून किमती साहित्य चोरीला गेलेले नाही. मात्र इतरांच्या घरातून सोनं, रोख रक्कम चोरीला गेली आहे तर अनेक शेतकऱ्यांचे कॉपर केबल चोरीला गेले आहे.

दरम्यान या चोरीमुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे. चोरीला गेलेल्या कोपर केबलची किंमत 7 लाखांपर्यंत आहे अशी माहिती धनंजय देशमुख यांनी दिली आहे. आता या प्रकरणाचा तपास वेगाने सुरु करण्यात आला आहे.
