रुपाली चाकणकरांचं टेन्शन वाढलं! पोलिसांनी थेट बहिणीला धाडली नोटीस, 5 दिवसात हजर राहण्याचे निर्देश..

पुणे: शेकडो महिलांचं लैंगिक शोषण करणारा नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात सध्या पोलीस कोठडीत आहे.त्याच्यावर आतापर्यंत बारा गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणाची व्याप्ती वाढत असताना राजकीय नेत्यांचे अधिक कनेक्शन उघड झाले आहेत. यामध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.आता पोलिसांकडून संबंधितांनाही नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे. शिर्डी पोलिसांनी आता रुपाली चाकणकर यांच्या बहीण प्रतिभा यांनाही नोटीस धाडली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, अशोक खरातची नाशिक, अहिल्यानगरमध्ये कोट्यवधींची संपत्ती आहे. त्याचे शेकडो बँक खात्याशी कनेक्शन असल्याचे उघड झालं आहे. अशोक खरात 132 बँक खात्याचा नॉमिनी आहे. याच प्रकरणात रुपाली चाकणकरांच्या बहीण प्रतिभा चाकणकर यांची चौकशी होणार आहे. समता पतसंस्थेत प्रतिभा चाकणकर आणि कुटुंबीयांच्या नावे चार खाती आहेत. प्रतिभा चाकणकर यांच्या नावे दोन तर मुलांच्या नावे दोन खाती आहेत.
खरात प्रकरणात आता नवीन नवीन खुलासे समोर येत असताना प्रतिभा चाकणकरांच्या बँक खात्यात 2 कोटी 40 लाख रुपयांचा व्यवहार देखील झाल्याचे समोर आलं आहे. याच प्रकरणात चौकशीसाठी शिर्डी पोलिसांनी प्रतिभा चाकणकर यांना नोटीस धाडली आहे.चाकणकर चौकशीला कधी हजर राहणार आणि त्यांच्या जबाबातून काय माहिती समोर येणार याकडे लक्ष लागलं आहे.

दरम्यान खरात प्रकरणाची विशेष तपास पथकाकडून चौकशी सुरू असताना प्रतिभा चाकणकर यांच्या पाठीमागे ही चौकशीचा ससेमिरा लागणार आहे. प्रतिभा चाकणकर यांच्या दोन पत्त्यावर नोटीस पाठवण्यात आली आहे. नोटीस मिळताच पाच दिवसाच्या आत चौकशीला हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यामुळे त्या हजर राहणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
