पुण्यात राजकीय भूकंप! अजित पवारांचा जुना सहकारी पक्षाला सोडचिट्टी देणार? 30 वर्षाची साथ राहणार?

पुणे : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीची पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उमेदवार आहेत. त्यांना निवडून आणण्यासाठी पक्षाने ताकद पणाला लावली आहे. या निवडणुकी दरम्यानच तीस वर्षांपासून सोबत असलेला अजित दादांचा पुण्यातील जुना सहकारी पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या चर्चेने जोर पकडला आहे.

बारामती पोटनिवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागलं असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली. या भेटीनंतर अजितदादांच्या पक्षाला रामराम करून ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना जोर आला. यानंतर आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी स्वतःबाबत पसरत असलेल्या भाजप प्रवेशाच्या बातम्यांवर स्पष्ट भूमिका मांडली आहे. या सर्व बातम्या त्यांनी ठामपणे फेटाळून लावल्या आहेत.
पुढे बोलताना ते म्हणाले,मी भाजपमध्ये जाणार असल्याची बातमी काही माध्यमांनी दिली, पण ती पूर्णपणे खोटी आहे. पुण्यातील एका कार्यक्रमासाठी गेलो असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची केवळ भेट झाली, मात्र कोणतीही बंद दाराआड चर्चा झालेली नाही असं त्यांनी स्पष्ट केलं.

गेल्या 30 वर्षांपासून मी अजित पवार यांच्या सोबत काम करत आहे. आता अजित पवारांच्या निधनानंतर अशा परिस्थितीत पक्ष सोडण्याचा प्रश्नच येत नाही. माझ्यावर अशी वेळ आलेली नाही की दुसऱ्या पक्षात जावं” असं दिलीप मोहिते पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे त्यांनी आपण अजूनही अजित पवार गटासोबत एकनिष्ठ असल्याच स्पष्ट केलं. त्यानंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला.