खरात प्रकरणात धक्कादायक माहिती! सात महिन्याच्या गरोदर महिलेवर देखील अत्याचार, तिसऱ्या गुन्ह्यात 5 दिवसाची कोठडी

पुणे : नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरातच्या काळ्या कारनाम्याची धक्कादायक माहिती समोर येत असताना आता खरातने सात महिन्यांच्या गरोदर महिलेला देखील सोडले नसल्याचे धक्कादायक माहिती अधिकाऱ्यांकडून कोर्टात समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, महिलांचे लैंगिक शोषण आणि अत्याचार प्रकरणात अटकेत असलेल्या भोंदू खरातची कसून चौकशी केली जात आहे. या प्रकरणात आज त्याला पुन्हा एकदा कोर्टात हजर करण्यात आले होते. त्याला तिसऱ्या गुन्ह्यात 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यावेळी कोर्टात सरकारी वकील, तपास अधिकारी, आरोपीचे वकील होते. न्यायमूर्ती बी . एन.इचपुराणिक यांच्या समोर सुनावणी झाली.
तपास अधिकाऱ्यांनी कागदपत्रे आणि सोबत लॅपटॉप आणला होता. यावेळी तपास अधिकाऱ्यांनी महत्वाचे पुरावे सादर केले.यावेळी तपास अधिकाऱ्यांनी कोर्टाकडे अशोक खरातची 7 दिवसांची कोठडी मागितली. परंतु कोर्टाने खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी दिली.यावेळी खरातने 7 महिन्यांच्या गरोदर महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झालं आहे.

खरातने केलेल्या कृत्याचा सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. एका महिलेला त्याने सातव्या महिन्यात नजर लागते म्हणून विशिष्ट विधी करावा लागतो असे सांगितले. त्याने महिलेला गुंगीचे औषध देऊन अत्याचार केला. विधी करत असताना नकली साप, नाग, वाघाचे कातडे दाखवण्यात आले.
दरम्यान लैंगिक अत्याचार करताना त्याने लॅपटॉपसमोर ठेवून व्हिडिओ काढल्याचा संशय आहे. खरातच्या गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे. खरात तपासात सहकार्य करत नाही, असेही अधिकाऱ्यांनी कोर्टात सांगितले. खरातच्या या प्रकरणामुळे आणखीन त्याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.