महिला सुरक्षित कुठे? ट्रायल रूममध्ये कपडे बदलताना ‘CCTV’मधून पाहत होता दुकानदार; पुण्यात खळबळ…

पुणे : पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. कपडे खरेदीसाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने कामशेत परिसरात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी “मुकेश फॅन्सी कॉर्नर” या दुकानाचा मालक मुकेश मुथा (रा. कामशेत) याला पोलिसांनी अटक केली आहे. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनंतर ही कारवाई करण्यात आली असून, घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला कपडे खरेदीसाठी संबंधित दुकानात गेली होती. यावेळी आरोपीने तिला कपडे बदलण्यासाठी दुकानातील स्टोअर रूममध्ये जाण्यास सांगितले.

मात्र, त्या स्टोअर रूममध्ये आधीच सीसीटीव्ही कॅमेरा बसवलेला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या माध्यमातून पीडितेच्या खासगीपणाचा भंग करण्यात आल्याचा आणि तिच्या लज्जेला धक्का पोहोचेल असे कृत्य केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच कामशेत परिसरात संतापाची लाट उसळली. काही काळासाठी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी मुकेश मुथा याला अटक केली आहे. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, अशा प्रकारच्या कृत्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.