विश्वराज हॉस्पिटलमध्ये दीड वर्षांच्या मुलीवर दुर्मिळ जन्मजात आजारावर यशस्वी उपचार

लोणी काळभोर : लोणी स्टेशन येथील विश्वराज हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने दीड वर्षांच्या मुलीवर दुर्मिळ जन्मजात आजारावर यशस्वी उपचार केले आहेत. ही प्रक्रिया बालहृदयरोग तज्ज्ञ डॉ.आशिष बनपुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ही उपचारपद्धती अत्याधुनिक आणि कमी चिरफाड (मिनिमली इन्व्हेसिव्ह) तंत्राने करण्यात आली.

सदर मुलगी काही काळापासून डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली होती. तपासणीदरम्यान तिच्या रक्तामध्ये अमोनियाचे प्रमाण थोडे जास्त आढळले. पुढील सखोल तपासणीत तिला “ॲबर्नधी मॅलफॉर्मेशन” हा अतिशय दुर्मिळ जन्मजात आजार असल्याचे निदान झाले. सामान्यतः पचनसंस्थेतून येणारे रक्त यकृतामधून जाऊन शुद्ध होते आणि त्यानंतर हृदयाकडे जाते.मात्र या मुलीच्या बाबतीत हे रक्त यकृताला न जाता थेट हृदयाकडे जात होते. त्यामुळे शरीरात विषारी घटक साचण्याचा आणि फुफ्फुस व यकृताशी संबंधित गंभीर समस्या निर्माण होण्याचा धोका होता.
डॉ. बनपुरकर यांनी सांगितले की, हा आजार अत्यंत दुर्मिळ असून साधारणपणे ५० हजारांपैकी एका बाळामध्ये आढळतो. योग्य वेळी उपचार न केल्यास यामुळे गंभीर गुंतागुंत होऊ शकते.” रुग्णाची स्थिती, यकृताची कार्यक्षमता आणि इतर तपासण्या लक्षात घेऊन डॉक्टरांनी ट्रान्सकॅथेटर डिव्हाइस क्लोजर ही आधुनिक उपचारपद्धती निवडली. या प्रक्रियेत शरीरात मोठी शस्त्रक्रिया न करता एका बारीक नळीच्या (कॅथेटर) मदतीने चुकीचा रक्तप्रवाह बंद करण्यात आला.

उपचारानंतर तपासणीत रक्तप्रवाह पूर्ववत यकृताकडे सुरू झाल्याचे स्पष्ट झाले. मुलीची प्रकृती चांगली असून तिला केवळ तीन दिवसांत रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. पुढील काळात तिची तब्येत पूर्णपणे सुधारण्याची अपेक्षा डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.
उपचारापूर्वी मुलीमध्ये यकृताशी संबंधित सौम्य त्रास, जसे की अमोनियाचे वाढलेले प्रमाण आणि कधीमधी नाकातून रक्त येणे, अशी लक्षणे दिसत होती. उपचारानंतर ही लक्षणे हळूहळू कमी होतील, असे डॉक्टरांनी सांगितले.
डॉ. बनपुरकर यांनी लवकर निदानाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “गर्भावस्थेपासूनच या मुलीवर लक्ष ठेवले गेले होते. त्यामुळे योग्य वेळी उपचार करणे शक्य झाले आणि यशस्वी परिणाम मिळाला.या उपचारात डॉ. विठ्ठल शेडगे (कार्डिॲक ॲनेस्थेसिया), डॉ. सत्यजित फुंडे (रेडिओलॉजिस्ट) आणि डॉ चंद्रकांत सहारे (इंटेन्सिविस्ट व बालरोगतज्ज्ञ) यांनी सहभाग घेतला.
ही यशस्वी कामगिरी विश्वराज हॉस्पिटलमधील प्रगत बालहृदय उपचारक्षमता दर्शवते आणि अशा दुर्मिळ आजारांवर वेळेत उपचार होऊ शकतात, याची आशा निर्माण करते