थोरले ‘वस्ताद’ मैदानात! बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध होणार? शरद पवारांचा मास्टर प्लॅन…

पुणे : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. ही निवडणूक बिनविरोध होण्याच्या आशा मावळल्या असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आता मैदानात उतरले आहेत. ते याबाबत स्वतः काँग्रेस हायकमांडशी चर्चा करणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

बारामती विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेस पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली होती. ते म्हणाले या दोन्ही जागावर यापूर्वी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शरद पवार गटाने निवडणूक लढवली होती. त्यामुळे या नियमानुसार या जागावर आता पहिला हक्क त्यांचाच आहे मात्र या जागावर आपले उमेदवार उभे करण्यास काँग्रेस पूर्णपणे सज्ज आहे असं त्यांनी स्पष्ट म्हटलं होतं.
या सर्व घडामोडी दरम्यान आता पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील हे शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओक या निवासस्थानी पोचले असून या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा होते याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध होईल असे सुरुवातीला बोलले जात होते. मात्र, काँग्रेसने ही निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली आहे.

या बारामती पोटनिवडणुकीत उमेदवार देणार असल्याचे काँग्रेसने जाहीर केल्यानं येथील बिनविरोध निवडणुकीचा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे शरद पवार हे स्वतः काँग्रेसच्या हायकमांडसोबत चर्चा करून बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी मैदानात उतरणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.