पालकांनो सावध रहा! पुण्यात धक्कादायक प्रकार; वर्षभराच्या बाळाला भीषण खोकला; एक्स-रेने उडाली डॉक्टरांची झोप…

पुणे : पुणे शहरातील ससून सार्वजनिक रुग्णालयात डॉक्टरांनी अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून एका वर्षाच्या चिमुकल्याचे प्राण वाचवले. दोन दिवसांपूर्वी खेळताना या बालकाने लहान दगडाचे तुकडे गिळले होते. सुरुवातीला स्थानिक डॉक्टरांनी तो दगड नैसर्गिकरीत्या शरीराबाहेर पडेल असा सल्ला दिला होता.

मात्र दुसऱ्याच दिवशी बाळाला अचानक तीव्र खोकल्याचे झटके सुरू झाल्याने पालकांची घाबरगुंडी उडाली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन बालकाला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे डॉक्टरांनी तत्परतेने उपचार करत यशस्वी शस्त्रक्रिया करून त्याचे प्राण वाचवले.
ससूनमधील कान, नाक आणि घसा विभागाचे प्रमुख डॉ. राहुल तेलंग यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बालकाची तपासणी केली. यावेळी एक्स-रेमध्ये धक्कादायक बाब समोर आली. बालकाच्या श्वासनलिकेतील मुख्य फाट्याजवळ (कॅरिना) एक कठीण वस्तू अडकली होती.

हा दगड उजव्या मुख्य श्वासनलिकेपर्यंत पसरला होता. ज्यामुळे श्वसनास अडथळा निर्माण होऊन बालकाच्या जिवाला मोठा धोका निर्माण झाला होता. अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार आणि वैद्यकीय अधीक्षक यल्लप्पा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली.
डॉ. राहुल तेलंग, भूलतज्ज्ञ विभागाच्या प्रमुख डॉ. सुरेखा शिंदे, डॉ. सुषमा तसेच बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. आरती किणीकर यांच्या तज्ज्ञ पथकाने अत्यंत दक्षता आणि कौशल्याने श्वासनलिकेत अडकलेला दगड बाहेर काढला. वेळेवर उपचार मिळाल्यामुळे मोठा अनर्थ टळला असून सध्या बालकाची प्रकृती स्थिर व समाधानकारक असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे की, लहान मुले खेळताना सहज कोणतीही वस्तू तोंडात टाकतात. त्यामुळे अशा प्रसंगी पालकांनी अधिक सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे.