पुणे -सोलापूर महामार्ग ठरला अपघाताचा ‘हॉटस्पॉट’! हायवा डंपरची दुचाकीला जोरदार धडक, टायरखाली तरुण भयानक चिरडला अन्…


पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे- सोलापूर महामार्गावर अपघाताचे सत्र वारंवार सुरूच आहे. या मार्गांवरील सोरतापवाडी फाटा (उरुळी कांचन) येथे हायवा डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही धडक इतकी जोरदार होती की, हायवा डंपरच्या टायर खाली तरुण जोरदार चिरडला त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, वैभव दयानंद सूर्यवंशी( वय 19 वर्षे, रा. बोरी फाटा) असं मृत झालेल्या तरुणांचे नाव आहे. वैभव दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सोरतापवाडी फाट्यावरून जात असताना हा भयानक अपघात घडला. ग्रामपंचायत हद्दीतून मुरूम भरून येणारा दहा टायर हायवा डंपर सोरतापवाडी फाट्यावर पुण्याच्या दिशेने वळण घेत होता. त्याचवेळी विरुद्ध दिशेने येणारा वैभव डाव्या बाजूच्या टायरखाली सापडून जागीच ठार झाला.

या घटनेची माहिती मिळताच कस्तुरी प्रतिष्ठानशी रुग्णवाहिका आणि चालक संतोष झोंबाडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमी अवस्थेत तरुणाला पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात नेण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. अपघाताची माहिती मिळताच उरळी कांचन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश भोसले,पोलीस कर्मचारी सुमित वाघ व रवीकुमार फड यांनी काही मिनिटात घटनास्थळी पोचून परिस्थिती नियंत्रणात आणली.

दरम्यान वैभवच्या मृत्यूला जबाबदार असलेला चालक सुनील जगन्नाथ शिगोटे याला पोलिसांनी ताब्यात घेतल असून त्याचा पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त असून पुणे सोलापूर महामार्ग हा अपघाताचा हॉटस्पॉट बनत चालला आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता स्थानिकांनी केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!