पुणेकरांनो सावधान! कोकण प्रवासापूर्वी लक्ष द्या; वरंधा घाट ‘या’ तारखेपर्यंत बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग…


पुणे : पुणे आणि कोकणाला जोडणारा महत्त्वाचा डोंगरी मार्ग असलेला वरंधा घाट तात्पुरता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. रस्त्याच्या दुरुस्ती आणि विकासकामांमुळे प्रशासनाने हा घाट ३० एप्रिल २०२६ पर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयामुळे पुणे ते कोकण दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना आता पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे. पुणे जिल्ह्यातील भोरपासून सुरू होऊन रायगड जिल्ह्यातील महाडपर्यंत जाणारा हा घाट मार्ग प्रवासासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

मात्र सध्या सुरू असलेल्या कामांमुळे आणि सुरक्षेच्या दृष्टीने हा मार्ग काही काळासाठी बंद ठेवण्यात आला आहे. पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार २५ मार्चपासून या मार्गावर ‘नो एंट्री’ लागू करण्यात आली आहे. हिरडोशी ते वरंधा घाट दरम्यान सध्या मोठ्या प्रमाणावर रस्त्याची दुरुस्ती, मजबुतीकरण तसेच सुरक्षा सुधारणा कामे सुरू आहेत.

या कामांमुळे सुरक्षेच्या कारणास्तव जड आणि हलक्या अशा सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीवर पूर्ण निर्बंध घालण्यात आले आहेत. राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, घाटातील रस्ता अधिक सुरक्षित आणि सुस्थितीत आणण्यासाठी दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. या कालावधीत वाहनांची ये-जा धोकादायक ठरण्याची शक्यता असल्याने, खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने संपूर्ण मार्ग तात्पुरता बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

वरंधा घाट हा निसर्गरम्य दृश्ये आणि ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध असल्याने दरवर्षी येथे मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. मात्र आता सुमारे महिनाभर हा मार्ग बंद राहणार असल्याने पर्यटकांबरोबरच स्थानिक व्यापारी आणि वाहतूकदारांवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भोर पोलीस प्रशासनाने वाहतूक नियंत्रणासाठी विशेष बंदोबस्त ठेवला असून नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सुरू असलेली कामे पूर्ण झाल्यानंतर हा घाट मार्ग अधिक सुरक्षित, रुंद आणि प्रवासासाठी सोयीस्कर होईल, अशी अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे.

पर्यायी मार्ग असे…
दरम्यान, प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुणे ते कोकण प्रवासासाठी ताम्हिणी घाट मार्ग (पुणे–मुळशी–माणगाव) हा सध्या सर्वात सोयीचा पर्याय मानला जात आहे. या मार्गाने प्रवासाचा कालावधी थोडा वाढू शकतो, मात्र तो सुरक्षित असल्याचे सांगितले जात आहे.

याशिवाय काही प्रवासी पोलादपूरमार्गेही प्रवास करत आहेत. मात्र या मार्गाने प्रवास केल्यास साधारण १ ते २ तासांचा अतिरिक्त वेळ लागू शकतो. त्यामुळे वाहनधारकांनी प्रवासाचे नियोजन करताना योग्य पर्यायी मार्ग निवडण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!