बारामतीच मैदान कोण मारणार? पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांविरुद्ध तीन उमेदवार रिंगणात; कुणी कुणी अर्ज भरला

पुणे : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर आता बारामतीच्या पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या बारामतीमधून निवडणूक लढणार आहेत.आता त्यांच्या विरोधात तीन जणांनी पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याची माहिती समोर आली आहे.

बारामती विधानसभेची पोट निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू असताना आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी बारामतीत उमेदवार देणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे आता ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे. या निवडणुकीसाठी जत,सातारा आणि सोलापूर या ठिकाणातील उमेदवार असल्याची माहिती मिळाली आहे.
राज्यातील बारामती आणि राहुरी विधानसभेसाठी होणाऱ्या पोट निवडणुकीसाठी 23 एप्रिलला मतदान होणार असून 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी जत तालुक्यातील सतीश कृष्णा कदम यांनी हिंदुस्तान जनता पार्टी कडून, सातारा येथील सागर शरद भिसे यांनी अपक्ष म्हणून तर सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील राघू घुटकुळे यांनी राष्ट्रीय समाज पार्टीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे ही निवडणूक अधिक चुरशीची ठरणार आहे.

बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होईल असा अंदाज वर्तवला जात होता. पण आता पहिल्याच दिवशी तीन अर्ज आल्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत आता कोण कोण मैदानात असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.