शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीक कर्जासह आता आणखी ‘या’ २ प्रकारचे कर्ज होणार माफ, निकष आले समोर…

मुंबई : राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा मोठा निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेण्यात आला आहे. सरकारकडून दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर करण्यात आली असली, तरी या माफीत नेमके कोणते कर्ज समाविष्ट होणार याबाबत सुरुवातीला संभ्रम निर्माण झाला होता.

मात्र, सहकार विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केवळ पीककर्जच नव्हे तर मध्यम मुदतीच्या कर्जाचाही या कर्जमाफीत समावेश असणार आहे. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार आहे.
या कालावधीत थकीत असलेले पीककर्ज तसेच शेतीसाठी घेतलेले मध्यम मुदतीचे कर्ज या दोन्ही प्रकारांमध्ये दोन लाख रुपयांपर्यंतची रक्कम माफ केली जाणार आहे.यामुळे ही कर्जमाफी केवळ पीककर्जापुरती मर्यादित न राहता अधिक व्यापक स्वरूपाची ठरणार असून, मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या अहवालानुसार, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत राज्यातील सुमारे २४ लाख ७३ हजार ५६६ शेतकरी थकबाकीत आहेत. या शेतकऱ्यांवर एकूण सुमारे ३५ हजार ४७७ कोटी रुपयांची थकबाकी आहे.
या थकबाकीत केवळ पीककर्जच नव्हे, तर मध्यम आणि दीर्घ मुदतीच्या कर्जांचाही समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कर्जमाफीचा निर्णय हा व्यापक स्वरूपाचा ठरणार असून, मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
सहकार विभागाने जिल्हा मध्यवर्ती बँका, राष्ट्रीयीकृत बँका तसेच इतर वित्तीय संस्थांकडून थकबाकीदार शेतकऱ्यांची सविस्तर माहिती संकलित केली आहे. या आकडेवारीत एक ते दीड लाख रुपयांपर्यंत पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे समोर आले आहे.
अनेक शेतकऱ्यांचे पीककर्ज नियमित असले, तरी मध्यम आणि दीर्घ मुदतीची कर्जे थकीत असल्याचेही चित्र दिसून आले आहे. त्यामुळे कर्जमाफीच्या निर्णयात या प्रकारच्या कर्जांचाही समावेश केल्याने अधिक व्यापक दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्यातील सोलापूर, पुणे, नाशिक, परभणी, धाराशिव, नांदेड, नागपूर, मुंबई, बुलढाणा, बीड, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये थकबाकीचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले आहे. एकूण थकबाकी सुमारे ३६ हजार कोटी रुपयांपर्यंत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, सरकारकडून कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून संबंधित विभागांकडून काम वेगाने सुरू आहे. साधारणतः ३० जूनपर्यंत पीककर्ज परतफेडीची अंतिम मुदत असते, त्यामुळे जाहीर करण्यात आलेली कर्जमाफी वेळेत लागू करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी माहिती देताना स्पष्ट केले की, पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी निश्चितच मिळणार आहे.