महाराष्ट्रात अवकाळीचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांत गारपिटीसह वादळी वाऱ्याचा ऑरेंज अलर्ट…

पुणे : एप्रिल महिन्याची सुरुवात होताच वाढत्या तापमानामुळे आणि उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. काही ठिकाणी कडक उन्हाचा तडाखा बसत आहे, तर काही भागांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

भारतीय हवामान विभागाने पुढील दोन दिवस राज्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला आहे. मात्र, बुधवार आणि गुरुवारी पावसाचा जोर तुलनेने कमी राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
उत्तरेकडून येणारे थंड वारे आणि आर्द्रतेने भरलेले वारे यांच्या संगमामुळे ही परिस्थिती निर्माण होत असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही दिवसांतील अवकाळी पावसामुळे आधीच बळीराजाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच आता महिन्याच्या अखेरीस पुन्हा पावसाळी वातावरण तयार झाल्याने शेतीसमोरील संकटे अधिकच गडद झाली आहेत.

या अनपेक्षित बदलामुळे फळांचा राजा मानल्या जाणाऱ्या आंब्याच्या पिकावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जोरदार वाऱ्यामुळे आंब्याचा मोहोर गळून पडण्याची शक्यता असून, त्यामुळे उत्पादनात मोठी घट होऊ शकते.
एकीकडे वाढता उकाडा आणि दुसरीकडे अवकाळी पावसाचा तडाखा, अशा दुहेरी संकटात सामान्य नागरिक आणि शेतकरी सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्वांनी विशेष खबरदारी घ्यावी आणि सतर्क राहावे, असे आवाहन केले आहे.
या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. अहिल्यानगर, बीड, धाराशिव, लातूर आणि सोलापूर या भागांमध्ये विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मंगळवारी जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, पुणे, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांनाही सतर्कतेचा अलर्ट देण्यात आला आहे.