पान खाताच ग्राहक बेशुद्ध; तपासात पुण्यातील मोठं रॅकेट उघड, कारखान्यावर छापा टाकताच पोलिसही हादरले…


पुणे : ‘खइके पान बनारसवाला’ म्हणत पानाचा आनंद घेणाऱ्यांसाठी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील एका पानटपरीवर ‘फूलचंद’ पान खाल्ल्यानंतर एका ग्राहकाला अचानक गुंगी आल्याची घटना घडली. या प्रकारामुळे अंमली पदार्थांच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे.

पानाच्या माध्यमातून तरुणांना नशेच्या आहारी लावणाऱ्या या टोळीचे धागेदोरे आता थेट कारखान्यापर्यंत पोहोचल्याचे समोर येत आहे. या प्रकरणामुळे शहरात एकच खळबळ उडाली असून, अशा प्रकारांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील पानटपऱ्यांवर ‘कडक’ आणि ‘फूलचंद’ नावाच्या पानांची मागणी वाढत असल्याचे दिसून आले होते. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि पानाची ‘किक’ वाढवण्यासाठी काही विक्रेते अमली पदार्थांच्या पावडरचा वापर करत असल्याचे तपासात समोर आले आहे.

ही घातक पावडर सुमारे दोन हजार रुपये प्रति ग्रॅम दराने विकली जात असून, ती काथ किंवा तंबाखूमध्ये मिसळून ग्राहकांना दिली जात होती. या प्रकारामुळे ग्राहकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला असून, या प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणाचा तपास करताना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने सखोल चौकशी सुरू केली. तपासादरम्यान या रॅकेटचे धागेदोरे मुळशी तालुक्यातील जांबे गावापर्यंत पोहोचले. तेथे नशेच्या पावडरची निर्मिती करणारा कारखानाच पोलिसांनी उघडकीस आणला.

जप्त करण्यात आलेल्या पावडरच्या प्राथमिक तपासात ओपिएट्स, बेन्झोडायझेपीन आणि मेथाम्फेटामाइनसारख्या अत्यंत घातक अमली पदार्थांचे अंश आढळून आले आहेत. हे रसायन थेट मानवी मेंदूवर परिणाम करत असून, त्याच्या सेवनामुळे व्यक्तीला तात्काळ गुंगी किंवा नशा जाणवू शकते.

तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारच्या पदार्थांचे नियमित सेवन केल्यास मानसिक अस्थिरता, व्यसनाधीनता आणि इतर गंभीर आजार उद्भवू शकतात. त्यामुळे या प्रकरणामुळे आरोग्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच वाल्हेकरवाडीतील एका पानटपरीवर पोलिसांनी छापेमारी करून मोठ्या प्रमाणात साठा जप्त केला. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, या रॅकेटचा आणखी विस्तार असण्याची शक्यता तपासली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!