पॅन कार्डधारकांसाठी अलर्ट! 1 एप्रिल 2026 पासून नियमांमध्ये मोठे बदल; अर्ज करताना नवीन अटी बंधनकारक…

मुंबई : भारतामध्ये आर्थिक व्यवहारांसाठी PAN कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहे. बँक व्यवहार, आयकर भरणे, गुंतवणूक तसेच मोठ्या आर्थिक व्यवहारांसाठी PAN आवश्यक असतो. दरम्यान, सरकारने PAN कार्डसंबंधित नियमांमध्ये मोठे बदल जाहीर केले असून हे नवे नियम 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार आहेत.

नवीन नियमांनुसार, PAN कार्डसाठी अर्ज करताना केवळ आधार कार्ड पुरेसे राहणार नाही. अर्जदारांना जन्मतारीख सिद्ध करणारे अतिरिक्त कागदपत्र (जसे की जन्म प्रमाणपत्र, 10वीचे प्रमाणपत्र, पासपोर्ट इ.) सादर करणे अनिवार्य असेल.
याशिवाय, आर्थिक व्यवहारांमध्येही PAN चा वापर अधिक नियमनबद्ध केला जाणार आहे. मोठ्या रोख व्यवहार, प्रॉपर्टी खरेदी-विक्री, वाहन खरेदी आणि इतर व्यवहारांसाठी PAN देण्याचे नियम बदलण्याची शक्यता असून यामुळे आर्थिक पारदर्शकता वाढवण्याचा सरकारचा उद्देश आहे.

नव्या नियमांनुसार, 2026-27 या आर्थिक वर्षापासून PAN कार्डसाठी अर्ज करताना आधार कार्डसोबत जन्मतारखेचा अधिकृत पुरावा सादर करणे अनिवार्य करण्यात येणार आहे. यामुळे अर्जदाराची ओळख अधिक अचूक आणि विश्वासार्ह पद्धतीने पडताळता येईल.
सरकारच्या मते, हा बदल कर प्रणाली अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्याच्या उद्देशाने करण्यात येत आहे. अनेक वेळा एका व्यक्तीच्या नावावर एकापेक्षा जास्त PAN कार्ड जारी झाल्याच्या घटना समोर येतात. नव्या नियमांमुळे अशा प्रकारच्या गैरप्रकारांना आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नव्या नियमांनुसार, PAN कार्डसाठी अर्ज करताना अर्जदारांना काही अतिरिक्त कागदपत्रे सादर करणे आवश्यक असेल. यामध्ये जन्म प्रमाणपत्र, मतदार ओळखपत्र, दहावीची मार्कशीट किंवा प्रमाणपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट तसेच मजिस्ट्रेटकडून प्रमाणित शपथपत्र यांचा समावेश असू शकतो.
तसेच, अर्ज करताना नमूद केलेले नाव आणि इतर वैयक्तिक तपशील आधार कार्डवरील माहितीसोबत अचूक जुळणे बंधनकारक असेल. यामुळे विविध कागदपत्रांमधील नावातील किंवा तपशीलांतील विसंगती कमी होऊन करदात्यांची माहिती अधिक अचूक आणि विश्वसनीय राहण्यास मदत होईल.
PAN कार्डसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम NSDL च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन “Apply Online” पर्याय निवडावा लागतो. त्यानंतर “New PAN – Indian Citizen (Form 49A)” हा पर्याय निवडून वैयक्तिक माहिती भरावी लागते.