महिलेशी केली ओळख, दाखवलं पुण्यातील म्हाडाच्या घराचं स्वप्न, अन् शेवट झाला भयंकर….

पुणे : एका महिलेची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळाच्या (म्हाडा) नावाखाली सदनिका मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका भामट्याने महिलेची १ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केली आहे.

तसेच या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, परिसरात एकच खळबळ उडाली आहे.पिंपरी-चिंचवडमधील रहाटणी येथे राहणाऱ्या ३७ वर्षीय तक्रारदार महिलेची आणि तिच्या पतीची एका व्यक्तीसोबत ओळख झाली होती.
या ओळखीचा फायदा घेत आरोपीने त्यांना म्हाडामध्ये सदनिका (फ्लॅट) मिळवून देण्याचे आमिष दाखवले. विश्वास संपादन करण्यासाठी त्याने तक्रारदार महिला आणि तिच्या पतीला कोंढवा परिसरातील एका इमारतीजवळ बोलावले. म्हाडाची सदनिका पक्की करून देतो, असे सांगून त्यांच्याकडून तब्बल १ लाख २० हजार रुपये उकळले.

पैसे दिल्यानंतर काही दिवस उलटले, मात्र आरोपीने घराचा ताबा मिळवून देण्याऐवजी टाळाटाळ सुरू केली. जेव्हा महिलेने पैशांबाबत आणि घराच्या प्रक्रियेबद्दल विचारणा केली, तेव्हा आरोपीने त्यांना उत्तरे देणे टाळले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलिसांकडे धाव घेतली. कोंढवा पोलिसांनी आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
म्हाडा किंवा तत्सम सरकारी योजनेच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी नागरिकांनी अधिकृत माहितीची खात्री करणे अत्यंत गरजेचे आहे.