हुंड्यासाठी छळ! पुण्यात आणखी एका लेकीचा बळी, लग्नानंतर ८ महिन्यांतच वैष्णवीने संपवलं आयुष्य…

पुणे : पुण्यातील लोणीकंद परिसरात एका २२ वर्षीय विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून राहत्या घरात ओढणीने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे. वैष्णवी जामकर असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव असून अवघ्या आठ महिन्यांपूर्वी झालेल्या लग्नाचा असा करुण अंत झाल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवीचे लग्न आठ महिन्यांपूर्वी मोठ्या थाटामाटात झाले होते. संसार सुखाचा होईल अशी स्वप्ने वैष्णवी आणि तिच्या माहेरच्यांनी पाहिली होती. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच सासरच्या मंडळींनी आपला खरा चेहरा दाखवण्यास सुरुवात केली.
पती, सासू आणि सासऱ्याकडून शुल्लक कारणावरून वैष्णवीचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू झाला. इतकेच नव्हे तर माहेरून पैसे आणण्यासाठी तिच्यावर सतत दबाव टाकला जात होता.

सासरच्या लोकांकडून होणारा सततचा अपमान आणि पैशांची मागणी यामुळे वैष्णवी कमालीची मानसिक तणावाखाली होती. अखेर या जाचाला कंटाळून तिने टोकाचे पाऊल उचलण्याचे ठरवले. राहत्या घरात कोणी नसताना तिने ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
वैष्णवीच्या माहेरच्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, लोणीकंद पोलिसांनी तिचे पती, सासू आणि सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हुंडा प्रतिबंधक कायद्यासह छळाच्या विविध कलमान्वये हा गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.