लाखो लाडक्या बहिणींना मोठा झटका, एका झटक्यात अनेकांचे पैसे झाले बंद, नेमकं कारण काय?

पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

मात्र या योजनेत अनेक गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आल्यावर लाभार्थी महिलांची पडताळणी करण्यात आली. ई-केवायसीही बंधनकारक करण्यात आली आहे. याचदरम्यान लाडकी बहीण योजनेसंदर्भात बीडमधून एक मोठी अपडेट समोर आली आहे.
बीड जिल्ह्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील दोन लाख 83 हजार लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत. सुरुवातीला कुठलेही निकष न लावता किंवा नियमांचे काटेकोरपणे पालन न करता लाडकी बहिण योजनेचे अर्ज मंजूर करण्यात आले होते.

मात्र आता अनेक निकष लावण्यात आलेले असुन काटेकोरपणे त्याचे पालन केले जात असल्याने बीड जिल्ह्यातील तब्बल 2 लाखांपेक्षा अधिक महिलांना त्याचा फटका बसला आहे. त्यामुळे एकूण 2 लाख 83 हजार बहिणी अपात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे.
लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यावर सुरुवातीला प्रतिमाह 1500 रुपयांचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींची संख्या ही 6 लाख 36 हजार इतकी होती. मात्र आता ही संख्या घटली असून ती एकदम 3 लाख 53 हजारांवर येऊन पोहोचली आहे.
ज्या कुटुंबाकडे चार चाकी गाडी आहे, ज्तसेच यांच्या घरात नोकरदार आहे, ज्यांना रिटायर झाल्यानंतर पेन्शन मिळत आहे किंवा इतर शासकीय योजनेचा दरमहा लाभ घेतला जात आहे, अशा लाडक्या बहिणी आता या योजनेसाठी अपात्रठरत असून त्यांना दरमहा 1500 रुपये मिळणार नाहीयेत.