पुणेकरांनो काळजी घ्या! पुन्हा GBS ची एन्ट्री, 51 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, पुण्यात या भागात दहशत….


पुणे : पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील नीरा येथे ‘गुईलेन बॅरे सिंड्रोम’ (जीबीएस) या अत्यंत दुर्मीळ आजाराने एका 51 वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

यंदाच्या वर्षातील या आजाराचा हा पहिलाच बळी असल्याने संपूर्ण जिल्हा आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. प्रशासनाने तातडीने पाण्याचे नमुने गोळा करण्याचे आणि सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले असून खासगी पाणी शुद्धीकरण केंद्रांचीही तपासणी केली जाणार आहे.

मागील वर्षी पुण्यात खळबळ उडाली होती. त्याला कारण पुण्यात आलेला नवीन आजार… ‘गुईलेन बॅरे सिंड्रोम’ म्हणजेच जीबीएसमुळे आरोग्य विभागाची धावपळ उडाल्याचं पहायला मिळालं होतं. योग्य नियोजनामुळे पुणेकरांची यातून लवकर सुटका झाली. अशातच आता यंदाच्या वर्षात पुन्हा जीबीएसने डोकं वर काढलं असून पुण्यात पुन्हा चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे.

उपचारादरम्यान 50 वर्षीय मन्सूर सय्यद यांचा मृत्यू झाला असून पुण्यातील आरोग्य विभाग पुन्हा अलर्ट मोडवर आले आहे. मृत मन्सूर सय्यद यांना मधुमेह व उच्च रक्तदाबाचा त्रास होता. जीबीएसच्या लक्षणांबरोबरच इतर व्याधींची गुंतागुंत वाढल्याने त्यांना हृदयविकाराचा झटका आला व उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

तर दुसरीकडे 46 वर्षीय कस्तुरी पटेल या महिला रुग्णाने वेळेत उपचार घेतल्यामुळे पूर्णपणे बरे होऊन घरी परतल्याची दिलासादायक माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. जीबीएस हा मज्जासंस्थेवर परिणाम करणारा आजार असून तो थेट संसर्गजन्य नसल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे. मात्र दूषित पाणी किंवा अन्नातून होणार्‍या संसर्गामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती मज्जातंतूंवर परिणाम करू शकते.

त्यामुळे प्रशासनाने पाणी स्रोतांची तपासणी, सॅनिटरी सर्व्हेलन्स व घरोघरी आरोग्य सर्वेक्षण सुरू केले आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नीरा परिसरात आणखी एका व्यक्तीला या आजाराची लक्षणे दिसून आली होती, मात्र वेळेत उपचार मिळाल्याने तो रुग्ण आता धोक्याबाहेर आहे. या घटनेनंतर गावात घबराट पसरू नये म्हणून आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!