UPI वापरकर्त्यांनो लक्ष द्या! महत्वाचे नियम बदलले; ‘ही’ सेवा आता झाली बंद, जाणून घ्या…

पुणे : UPI वापरकर्त्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. UPI प्रणालीमध्ये महत्त्वाचा बदल करण्यात आला असून ऑनलाईन व्यवहार करताना मोबाईल नंबर किंवा UPI आयडी टाईप करून पेमेंट करण्याची सवय आता बदलणार आहे.

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांनी सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला असून 28 फेब्रुवारी 2026 पासून नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. आतापर्यंत अनेक जण ऑनलाईन खरेदी करताना किंवा एखाद्या वेबसाईटवर पेमेंट करताना आपला UPI आयडी टाईप करून व्यवहार पूर्ण करत होते.
या प्रक्रियेला ‘UPI कलेक्ट’ असे म्हटले जात होते. या पद्धतीत ग्राहकाने आपला आयडी किंवा मोबाईल नंबर दिल्यानंतर त्या व्यवहारासाठी संबंधित UPI ॲपवर पेमेंटची विनंती पाठवली जात असे.

मात्र या प्रणालीमुळे अनेकदा चुकीचा आयडी टाकला जाणे किंवा बनावट लिंकद्वारे फसवणूक होण्याच्या घटना वाढत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी आणि वापरकर्त्यांकडून होणाऱ्या मानवी चुका कमी करण्यासाठी NPCI ने ही सुविधा सर्वसाधारण व्यवहारांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या बदलाची अंमलबजावणी 28 फेब्रुवारी 2026 पासून सुरू झाली आहे.
नवीन नियमानुसार आता बहुतेक ऑनलाईन व्यवहारांमध्ये थेट ॲप आयकॉन किंवा QR कोडचा वापर करून पेमेंट करावे लागेल. पेमेंट करताना स्क्रीनवर Google Pay, PhonePe किंवा Paytm यांसारख्या ॲप्सचे चिन्ह दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर संबंधित ॲप आपोआप उघडेल आणि वापरकर्ता काही क्षणात व्यवहार पूर्ण करू शकेल.
तसेच पेमेंटसाठी डायनॅमिक QR कोडचा पर्याय देखील उपलब्ध असेल. हा कोड स्कॅन करून वापरकर्ता थेट पैसे पाठवू शकतो. मात्र काही विशिष्ट व्यवहारांमध्ये जुनी पद्धत सुरू राहणार आहे. शेअर बाजार आणि IPO अर्ज करताना UPI आयडी मॅन्युअली टाकावा लागेल.
तसेच Apple वापरकर्त्यांसाठी ब्राऊझरद्वारे खरेदी करताना जुनी प्रक्रिया वापरली जाईल. याशिवाय आंतरराष्ट्रीय व्यवहार आणि आधी सेट केलेल्या ऑटो-डेबिट पेमेंटमध्ये बदल करण्यासाठी देखील मॅन्युअल एन्ट्रीचा पर्याय उपलब्ध राहणार आहे.