अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी रोहित पवार संतापले, VIP पाहुणचार केल्याने सगळंच बाहेर काढलं, म्हणाले काळे कारनामे…


पुणे : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारीला बारामती येथे झालेल्या विमान अपघातामध्ये मृत्यू झाला होता. यानंतर अजित पवार प्रवास करत असलेल्या व्हीएसआर कंपनीची विमाने सदोष असल्याचा आरोप करत आमदार रोहित पवार यांनी या कंपनीविरोधात रान उठवले होते.

या पार्श्वभूमीवर गुरुवारी व्हीएसआर कंपनीचे मालक आर.के. सिंग यांना सीआयडीने चौकशीसाठी बोलावले होते. त्यानुसार काल आर.के. सिंह हे पुण्यातील सीआयडीच्या कार्यालयात हजर झाले होते. काही तास चौकशी करुन त्यांना घरी सोडणयात आले.

मात्र, आता आमदार रोहित पवार यांनी शुक्रवारी ट्विट करुन सीआयडीच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी आलेल्या आर.के. सिंह यांना एखाद्या पाहुण्यासारखी वागणूक दिली, असे रोहित पवार यांनी सोशल मीडियावरील आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

अजितदादांच्या दुर्दैवी मृत्यूला कारणीभूत असलेल्या अनेकांपैकी एक कारण असलेला #VSR कंपनीचा मालक व्ही. के. सिंग याला CID ने चौकशीसाठी बोलावलं होतं की शाही पाहुणचारासाठी? याबाबतच आता शंका निर्माण झालीय. सकाळी ११ वाजता आल्यानंतर त्याची आठ तास चौकशी केल्याचं सांगण्यात आलं पण प्रत्यक्षात बहुतांश वेळ त्याची बडदास्त ठेवण्यात आणि पाहुणचार करण्यातच गेला.

रात्री तर काळ्या काचा लावलेल्या पोलिसांच्या गाडीतून पाहुण्याप्रमाणे त्याची पाठवणी केली गेली. यामागं काय काळंबेरं आहे म्हणून काळे कारनामे करणाऱ्याला असं काळ्या काचेच्या गाडीतून सोडलं गेलं? पण कितीही काळे पडदे टाकण्याचा प्रयत्न केला तरी याप्रकरणी सत्याचा सूर्य उगवल्याशिवाय राहणार नाही, असे रोहित पवारांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

एकीकडं आमचा हक्क असूनही या अपघाताबाबत FIR पण नोंदवून घेतला जात नाही पण दुसरीकडं ज्याच्या विमानाने अजितदादांना आपल्यातून हिरावून नेलं त्या व्ही. के. सिंगला मात्र कुणाच्या आशीर्वादाने VIP ट्रीटमेंट दिली जाते? याबाबतचं वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांनाही पोलीस अत्यंत चुकीची वागणूक देतात. अशा परिस्थितीत आतातरी अजितदादांसोबत काम केलेले आणि त्यांचे ‘विश्वासू’ सत्ताधारी आमदार जागे होतील का?, असा सवाल उपस्थित करत रोहित पवार यांनी अजितदादा गटाच्या आमदारांना या मुद्द्यावर बोलण्याचे अप्रत्यक्ष आवाहन केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!