राष्ट्रवादीच्या 20 हून अधिक आमदारांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट, आता मुख्यमंत्र्यांचीही भेट घेणार; नेमकं काय घडतयं?

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईहून बारामतीकडे जात असताना त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. 28 जानेवारी रोजी सकाळी 8.10 वाजता अजित पवार मुंबईहून बारामतीकडे निघाले होते.

यादरम्यान बारामती विमानतळाच्या अगदी जवळ त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. हा विमान अपघात इतका जास्त भीषण होता की, विमानातील एकही व्यक्ती जिवंत राहू शकली नाही. अजित पवार यांचा विमान अपघात झाल्याचे कळताच सर्वांना मोठा धक्का बसला.
बारामतीत त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर चौथ्या दिवशी अजित पवार यांच्या पत्नी, सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर काही दिवसांनी त्यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही सर्वानुमते निवड करण्यात आली.

उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या बैठका, सभा, दौरे यांना आता सुरूवात झाली आहे. दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेसमधून एक मोठी अपडेट समोर आलीआहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 20 पेक्षा जास्त आमदारांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. काल रात्री उशीरा, मुंबईतील देवगिरी निवासस्थानी सुनेत्रा पवार या आमदारांनी भेटल्या. या भेटीत आमदारांकडून डीजीसीएच्या अहवालाबाबत शंका उपस्थित करण्यात आल्याचे समजते.
अजित पवारा यांच्या अपघातानंतर महिन्याभराने डीजीसीएचा अहवाल समोर आला. मात्र त्या अहवालातील त्रुटी दाखवत तसेच अजित दादांच्या अपघात प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करून देखील अद्याप का नेमण्यात आलेली नाही, याबाबत आमदारांकडून सवाल उपस्थित करण्यात आले.
या अपघाताबाबत सर्वसामान्यांच्या मनात अनेक शंका असून, सदर शंकांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सर्वांनी एकत्रित भेट घेण्याबद्दल आमदारांनी सुनेत्रा पवार यांना विनंती देखील केली. सर्वांनी मुख्यमंत्र्यांना एकत्रित भेटू असं आश्सावन यावेळी सुनेत्रा पवार यांनी दिलं. जानेवारी महिन्यात अजित पवार यांचा विमानन अपघातात मृत्यू झाला, त्या अपघातानंतर ज्या वस्तू मिळाल्या, त्याही यावेळी आमदारांना दाखवण्यात आल्या, अशी माहिती समोर आली आहे.